“देणे समाजाचे’

एखाद्या दुःखद घटनेतून चांगले कार्य उभे राहते यावर कदाचित विश्‍वास बसणार नाही. परंतु श्रीमती वीणा गोखले यांच्या बाबतीत मात्र हे खरं झालं आणि “देणे समाजाचे’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरुवात झाली आणि आजतागायत तो यशस्वी वाटचाल करत आहे. आर्टिस्ट्रीतर्फे हा उपक्रम केला जातो.

आपल्या विशेष मुलीला वाढवताना स्वयंसेवी संस्थांना भेटी द्यायचा योग आला आणि त्यांना जाणवलं की या स्वयंसेवी संस्था एवढं मोठं काम करत आहेत यांच्या गरजांचा विचार नक्कीच व्हायला हवा आणि या संस्था जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी काहीतरी करायला हवं. यातूनच “देणे समाजाचे’ या उपक्रमाचा जन्म जाला आणि या स्वयंसेवी संस्थांना लोकांसमोर येण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झालं.

“देणे समाजाचे’ हा असा प्रकारचा एकमेव उपक्रम आहे. गेली 14 वर्षे हा उपक्रम अव्याहतपणे राबवला जातो. उपक्रमाविषयी बोलताना वीणा गोखले म्हणाल्या, “आज मागे वळून पाहिलं तर विश्‍वासच बसत नाही की आतापर्यंत 2005 ते 2018 या काळात 165 संस्थांनी यात भाग घेतला. या संस्थांना सुमारे चार कोटीहून अधिक रुपयांची आर्थिक मदत मिळाली. त्यामुळे त्यांचे महत्त्वाचे उपक्रम उभे राहिलेत.’ लोकांना, मदत करायला, आवडतं, पण ती नेमकी कोणाला आणि कशी करायची हे माहीत नसंत, खूप जणांना प्रत्यक्ष काम करायलाही आवडतं अशा सगळ्यांना “देणे समाजाचे’ने संधी उपलब्ध करून दिली. याचा चांगला परिणाम म्हणजे संस्थांना पैसा, वस्तूरूपाने आणि मनुष्यबळाच्या रूपाने मदत मिळाली. शिवाय या उपक्रमातून लोक आणि स्वयंसेवी संस्था यांचे थेट नाते जुळले आहे.

कार्य करणाऱ्या संस्थांची क्षेत्र तरी किती मतिमंद व्यक्ती, वृद्ध व्यक्ती, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या, पर्यावरण, आदिवासी विकास, एकल महिला, तमाशातील मुलांसाठी काम करणाऱ्या, अंध व्यक्तींसाठी काम करणाऱ्या, अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था सहभागी झाल्या.

यंदा सियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्‍सिजन प्लांट बसवणारी “सिर्फ’ संस्था, जखमी झालेल्या पक्षी प्राण्यांचा सांभाळ करणारी संस्था, पालघरमधील मल्टीपल डिसऑर्डर असलेल्या मुलांसाठी त्यांचे पालक चालवत असलेली संस्था सहभागी होणार आहेत. यावर्षी कर्वे रोड येथे हा उपक्रम संपन्न झाला. यंदा 30 सेवाभावी संस्था यात सहभागी झाल्या होत्या.

समाजभान जपणाऱ्या सुहृदांनी या उपक्रमाला जरूर भेट द्यावी. “दान नेहमी सत्पात्री असावं’, असं म्हटलं जातं. त्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. या संस्थांना या उपक्रमात भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. शिवाय या संस्थांना लोकांपर्यंत पोचण्यासाठी सलग दोन वर्षे सहभागी होता येते. पाहता पाहता या उपक्रमाने एक तप पूर्ण केलं. आता मात्र पुणेकर “देणे समाजाचे’च्या तारखा विचारतात, इतकी आस्था वाढली आहे.

– डॉ. नीलम ताटके

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)