“सैराट’फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या आईवडिलांसोबत लॉकडाऊनचा वेळ घालवत आहे. घरातील कामे, चित्रे काढणे, वेबसिरीज पाहणे यात ती स्वत:ला गुंतवून ठेवत आहे. याच काळात तिला तिच्या अभ्यासाची फार चिंता सतावत आहे.
एका मुलाखतीत रिंकू म्हणाली, आमच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार असल्याची चर्चा होती. आम्ही सगळी तयारी केली होती. मात्र, आता ते म्हणताहेत की परीक्षा होणार नाहीत. नवीन अभ्यासक्रम सुरू होईल तेव्हा काय होईल, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. रिंकू सध्या एफवायबीएचे शिक्षण घेत आहे. “माझं शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी आई-वडील आग्रही आहेत. त्यामुळे शिक्षण पूर्ण केल्याशिवाय मी अभिनयाकडे फार लक्ष देऊ शकत नाही, असे ती म्हणाली.
दरम्यान, रिंकूची नुकतीच एक वेबसिरीज रिलीज झाली आहे. या वेबसिरीजला चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. याशिवाय पहिल्याच बॉलीवूड चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळाल्याने रिंकूने आनंद व्यक्त केला आहे. ती लवकरच “झुंड’ या बॉलीवूड चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले असून त्यात अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे.