पिंपरी- करोनामुळे मंगळवारी भोसरीतील एकाचा मृत्यू झाला. यामुळे शहरात मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या पाचवर गेली आहे. तसेच आणखी चार जणांना नव्याने करोनाची लागण झाली आहे.
आत्तापर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील २२९ जणांना करोनाची लागण झाली आहे. सध्या ८२ जणांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरात वास्तव्यास असलेल्या ११ जणांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत १३१ जण करोना मुक्त झाले आहेत.
आज मयत झालेली व्यक्ती भोसरी परिसरातील आहे. तसेच करोना बाधित आलेले तीन रूग्ण रूपीनगर आणि भोसरी परिसरातील आहेत. शहराबाहेरील करोना बाधित रूग्ण आंबेगाव येथील रहिवासी आहे.
महापालिकेच्या वॉर रुममधील डॅशबोर्डवर आज दोघांचा मृत्यू झाल्याचे दाखविले आहे. तर आत्तापर्यंत एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. डॅशबोर्ड आणि प्रेसनोट यामधील माहितीत विसंगती असल्याचे वारंवार दिसून येत आहे.