म्हसवड – माणगंगा नदीच्या पात्रातील किमती वाळूची चोरी करुन विक्रीसाठी चक्क गुजरातमध्ये नेली जाणारी वाळू माणच्या तहसीलदार बी. एस. माने यांनी छापा टाकून पकडली. यावेळी 40 टन मालवाहतूक क्षमतेचा 22 चाकी ट्रेलर म्हसवड येथील माण नदीच्या पात्रालगत पकडला. या कारवाईत संबंधित ट्रेलर चालकाने पलायन केल्याचा प्रकार काल घडला.
राज्यात व परराज्यातही गेल्या आठ दिवसांपासून पावसाचे थैमान सुरु झाल्यामुळे ठिकठिकाणी वाळू उपसा केल्या जाणाऱ्या नदीची पात्रे दुथडी भरुन वाहत आहेत. परिणामी बांधकाम व्यवसायात वाळूची मागणी जादा व पुरवठा कमी अशी परिस्थिती उदभावल्यामुळे वाळूच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. माण तालुक्यातही पावसाने हजेरी लावली असली तरी माण नदीच्या पात्रात ठिकठिकाणी सिमेंट बंधारे आहेत.
त्यामुळे नदीच्या उगमापासून असलेले बंधारे टप्याटप्याने भरू लागल्यामुळे म्हसवड भागातील नदीचे पात्रात अजूनही पुरेसे पाणी वाहत नाही. पात्र ठिकठिकाणी कोरडे राहिल्याचा फायदा वाळू माफियांनी घेतला असून चोरून वाळूचा उपसा करुन तो जिल्ह्यात परजिल्ह्यात तर आता गुजरात राज्यात विक्रीस नेऊन अमाप कमाई करण्याची जणू स्पर्धाच सुरु झाली आहे. काल पहाटेच्या सुमारास सांगली ते गुजरात राज्यात नियमित वाळूची वाहतूक करणारा 22 चाकी 40 टन वजनभार वाहतूक क्षमतेचा ट्रेलर येथीलच वाळू तस्कराच्या मदतीने माण नदीच्या पात्रातील वाळू भरण्यासाठी दाखल झाला.
पात्रातून वाळूचा उपसा करुन नदी पात्रालगत साठा करून ठेवलेली वाळू त्या ट्रेलरमध्ये भरली जात असल्याची माहिती तहसीलदार बाई माने यांना मिळताच त्यांनी म्हसवडचे तलाठी ए. यू. अखडमल, म्हसवड व राणंदचे कोतवाल राजू पाचोळे, ए. डी. गुजर इत्यादी कर्मचाऱ्यांसमवेत छापा टाकून ट्रेलर ताब्यात घेतला. ट्रेलरच्या चालकाने पलायन केले. त्यानंतर हा भला मोठा ट्रेलर म्हसवड पोलीस ठाण्यात आणण्यासाठी तलाठी अखडमल यांना खूपच मेहनत घ्यावी लागली.
सखोल चौकशीनंतर हा ट्रेलर येथील वाळू भरुन गुजरात राज्यात विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती मिळाली. वाळू तस्करीसाठी तब्बल 22 चाकी ट्रेलरचा वापर प्रथम झाला असल्यामुळे महसूल खात्यातील कर्मचारीही अचंबित झाले. वाळू चोरून परराज्यात विक्रीसाठी पाठविणारी आंतरराज्य वाळू तस्करीची ही पहिलीच घटना आहे. या आंतरराज्य वाळू तस्करीच्या टोळीचा सूत्रधार माण तालुक्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे.
माण नदीतील वाळू चोरी रोखणे दिवसेंदिवस आव्हानात्मक होत असून चोरीच्या प्रकारावर आळा घालण्याचा महसूल कर्मचारी व मी प्रयत्नशील राहत आहे. अनेकदा वाळू तस्करांचे कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रकार घडत आहेत. नदी पात्रालगतच्या शेतकऱ्यांनाही वाळू तस्करांकडून दमबाजीचे प्रकार घडत असतात. जिवावर उदार होऊन कर्मचाऱ्यांसमवेत वाळू चोरट्यांवर कारवाई करीत आहोत.
बाई माने, तहसीलदार, माण