पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७० वा वाढदिवस ;देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 70 वा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी यांचा जन्म 17 सप्टेबर 1950 रोजी गुजरातच्या वडनगरमध्ये झाला होता. मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 14 सप्टेंबरपासून भाजप एक आठवड्याचे सेवा कार्य करत आहे. राष्ट्रीय स्तरापासून राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर सेवा कार्य केले जात आहे.

भाजपने पंतप्रधान मोदींच्या 70 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुका पातळीवर किमान 70 गरजूंची सेवा करण्याचे निर्देश दिले आहेत. दिव्यांगांसाठी शिबिर आयोजित करुन त्यांना आवश्यक उपकरणे दिली जातील. प्रत्येक जिल्ह्यातील 70 ठिकाणी स्वच्छतेचा कार्यक्रम, फळांचे वितरण, रुग्णालयातील रुग्णांची देखभाल आणि रक्तदान असे कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय भाजप कार्यालयात आज सकाळी दहा वाजता कार्यकर्ते केक कापणार आहेत. तर आज दुपारी चार वाजता चांदनी चौकमध्ये एका कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा दिव्यांगांना 70 उपकरण वितरित करणार आहेत.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांकडून दुपारी 12 वाजता एक व्हर्च्युअल कार्यक्रम होणार आहे. दुपारी 12.30 वाजता केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, डॉ जितेंद्र सिंह आणि भाजप खासदार मनोज तिवारी विविध सामाजिक संघटनांच्या मदतीने पाकिस्तानहून आलेल्या हिंदू शरणार्थींना मजलिस पार्क कॅम्प, आदर्श नगर, नवी दिल्लीत शिलाई मशीन, ई-रिक्षा आणि जेवणाच्या वस्तूंचं वितरण करतील. तर नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाआधी तामिळनाडूच्या भाजप कार्यकर्त्यांनी 70 किलोंचा लाडू श्री कामाक्षी अम्मन मंदिरात अर्पण केला. त्यानंतर तो कोईंबतूरमधील लोकांना वाटला.

मागच्या वाढदिवसाला पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये गेले होते. सरदार सरोवर धरणावरील नर्मदा देवीच्या महाआरतीमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. तर 68वा वाढदिवस त्यांनी आपला मतदारसंघ वाराणसीमध्ये साजरा केला होता. नरेंद्र मोदी यांना सहा भावंडं आहेत. मोदींना एक मोठी बहिण आणि दोन मोठे भाऊ आहेत. तर दोन धाकटे भाऊ आणि एक लहान बहिण आहे. सर्वात मोठ्या बहिणीचं नाव शारदाबेन, त्यानंतर भाऊ सोमभाई, अमृतभाई. नरेंद्र मोदींपेक्षा लहान असलेल्या भावाचं नाव प्रह्लादभाई, त्यानंतर बसंतीबेन आणि मग पंकज मोदी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.