राज्यातील रंगमंदिरे खुली करण्यासाठी कलाकारांचे आंदोलन

पुणे – राज्यातील रंगमंदिरे खुली करावी या आणि अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी काही कलाकारांनी बालगंधर्व रंगमंदिर येथे बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

लॉकडाऊनमुळे सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहेत. यामुळे कलाकार व इतर बॅक स्टेज मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या कलावंतांना राज्य सरकारने सुविधा द्याव्यात, यासाठी कलाकारांची शिखर संस्था “महाकला मंडळाने’ हे आंदोलन पुकारले.

‘मंडळामध्ये 125 संस्था सहभागी झाल्या असून, सुमारे आठ लाख कलाकार यांचा समावेश आहे. या कलाकारांसाठी काही प्रमुख मागण्या मंडळाने प्रस्तावित केल्या असून, त्यांची पूर्तता राज्यसरकारने करावी, यासाठी अभिनेते कुमार पाटोळे आणि कलामंडळाचे काही सहकारी हे आमरण उपोषणाला बसले होते. 

मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, ऍड. मंदार जोशी, अशोकराव जाधव यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.

मंडळाच्या प्रमुख मागण्या
– राज्यातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, संस्थांची शासन दरबारी नोंद करणे.
– कलाकार म्हणून शासनाचे अधिकृत ओळखपत्र, आरोग्य विमा द्यावा.
– शासकीय मानधनासाठी सध्याची 60 वर्षांची वयोमर्यादा कमी करणे.
– शासनाकडून प्रत्येक कलाकाराला निवृत्तीवेतन मिळावे.

Leave A Reply

Your email address will not be published.