नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून म्हणजेच 2 मेपासून परदेश दौऱ्यावर आहेत. या विदेश दौऱ्यात पंतप्रधान तीन युरोपीय देशांचा दौरा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी ते जर्मनी, डेन्मार्क आणि पॅरिसलाही भेट देणार आहेत. यादरम्यान ते सुमारे 65 तास परदेशामध्ये असणार आहेत. परदेश दौऱ्यादरम्यान पंतप्रधान 25 कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
पंतप्रधान मोदी सात देशातील आठ नेत्यांसोबत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय बैठक करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय पंतप्रधान 50 जागतिक व्यावसायिकांशीही संवाद साधणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पंतप्रधान मोदी 2 मे रोजी जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सच्या तीन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या वर्षी होणारा त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे.
पंतप्रधान मोदी या विदेश दौऱ्यादरम्यान आधी जर्मनी, नंतर डेन्मार्क आणि नंतर काही काळ पॅरिसमध्ये मुक्काम करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी जर्मनी आणि डेन्मार्कमध्ये प्रत्येकी एक रात्र घालवतील. युक्रेनचे संकट सुरू असताना आणि रशियाच्या हल्ल्यांमुळे जवळजवळ संपूर्ण युरोप एकवटला आहे अशा वेळी होणार पंतप्रधान मोदी यांचा दौरा फारच महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 आणि 3 मे रोजी जर्मनीला भेट देणार आहेत. यानंतर 3 आणि 4 मे रोजी ते डेन्मार्कला जाणार असून त्यानंतर तेथून फ्रान्सलाही जाणार आहेत. त्यानंतर, 4 मे रोजी परतीच्या वेळी ते पॅरिसमध्ये काही काळ थांबतील.