शेवगाव -जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेला मोठा नफा होत असल्याने सभासदांच्या कर्जावरील व्याजदरातही कपात करून सर्व कर्जाचा व्याजदर 9 टक्के करावा अशी मागणी रोहोकले प्रणीत गुरूमाऊली मंडळाच्या उच्चाधिकार समितीचे कार्याध्यक्ष प्रल्हाद गजभिव यांनी केली आहे.
गजभीव यांनी बॅंकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक शिक्षक बॅंकेने एक एप्रिल 2020 पासून सर्व प्रकारच्या ठेवींवरील व्याजदरात सरासरी एक टक्का कपात केली आहे.
म्हणजेच मुदत, सेव्हिंग, रिकरिंग ठेवीचा व्याजदर बॅंकेच्या इतिहासात सर्वात कमी म्हणजेच 3 टक्के ते 7.25 टक्के झाला आहे. यावर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील ठरावा नुसार, कायमठेवीला दिले जाणारे व्याज हे मुदत ठेवींच्या कमाल व्याजदराइतके म्हणजेच 7.25 टक्के एवढे चालू वर्षी कायम ठेवीवर मिळणार आहे. त्यामुळे कायम ठेवीवर सुद्धा 0.75 टक्के कपात झाली आहे.
यापुर्वी सभासद हिताच्या निर्णयांना नेहमीच रिझर्व बॅंकेच्या नियमांचा बागलबुवा दाखवणाऱ्या शिक्षक बॅंकेने सद्य परिस्थितीत रिझर्व बॅंकेने जाहिर केलेल्या सभासदहिताच्या योजनांची त्वरित अंमलबजावणी करावी. चालू आर्थिक वर्षातील 3 महिने संपत आले आहेत. त्यामुळे 1.25 टक्के व्याजदर कमी करून सर्व प्रकारच्या कर्जाचा व्याजदर तातडीने 9 टक्के करावा. अन्यथा करोनासंबंधी निर्बंध व लॉकडाऊन संपल्यानंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा गजभिव, विकास मंडळाचे उपाध्यक्ष कल्याणराव पोटभरे, तहकिक, बाबा तांबे, रुस्तुम दौंड, रमेश शिंदे, सुभाष गर्जे, अशोकराव मडके, संतोष येंडे, गर्कल, ज्ञानदेव बटुळे, रामदास बडे, भागवत घुले, रफिक शेख, मुकुंद जोशी, सुरेश मुरकुटे, सुरेश पिसे, पाटील यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.