राहाता -तालुक्यातील लोणी खुर्दमध्ये अर्थात प्रवरानगर सीमेलगत मुंबई येथून आलेले, दहा दिवस क्वारंटाइन केलेले अन् आठ दिवस होम क्वारंटाइन केलेले आई अन् मुलगा, असे दोघे करोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या संपर्कातील सहा जणांना तपासणीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती डॉ. श्रीपाद मैड यांनी दिली.
राहाता तालुक्यातील लोणी खुर्दमध्ये एका शिक्षकाने केलेल्या पार्टीमुळे स्वतः शिक्षक करोना पॉझेटिव्ह झाला होता. त्यानंतर पुन्हा मुंबई येथून आलेल्या व प्रवरानगर येथे भावाकडे वास्तव्यास असलेल्या 34 वर्षीय बहिणीस व तिचा 10 वर्षीय मुलाला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या मायलेकांना मुंबईहून आल्यानंतर लोणी खुर्दमधील शाळेत दहा दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यानंतर सदर महिलेस व तिच्या मुलास घरातील एका वेगळ्या खोलीत आठ दिवस होम क्वारंटाइन करण्यात आले होते.
मात्र तीन दिवसांनंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांचे स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्या दोघांचे अहवाल चौदा दिवसांनंतर पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती दाढ प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. श्रीपाद मैड यांनी दिली. दोन करोनाबाधित सापडल्याने लोणी खुर्द हद्दीत असलेला प्रवरानगर येथील परिसर डॉ. संजय घोलप, ग्रामसेवक शशिकांत चौरे व लोणी पोलिसांनी सील केला आहे.