महाबळवाडी येथील प्राथमिक शाळेला अवकळा

रघूनाथ थोरात
प्रशासनाचे वेळकाढू धोरण; ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर, तात्काळ दुरूस्तीची मागणी

चाफळ  – चाफळ, ता. पाटण विभागातील दाढोलीपासून अवघ्या दोन किमी अंतरावर असणाऱ्या महाबळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे अवकळा आली आहे.

शाळेच्या प्रवेशद्वारावरील लोखंडी गेट मोडून पडले आहे. विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या शौचालयाचा दरवाजा निखळून पडल्याने शौचालयाची दुरावस्था झाली आहे. तसेच शाळेच्या धोकादायक असणाऱ्या जुन्या आणि पलिकडील नवीन बांधलेल्या इमारतीच्या मधील बोळात लोखंडी सळई, दरवाजे आदि धोकादायक साहित्य पडले असल्याने तसेच शाळेच्या पटांगणात असणाऱ्या खेळण्यांच्या आसपासच्या परिसरात ठिकठिकाणी कापलेल्या झाडांचे बुडके जमिनीपासून साधारणपणे अर्धा ते एक फूट वर असल्यामुळे खेळताना ठेच लागून एखादा विद्यार्थी गंभीर जखमी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

तसेच येथे असणाऱ्या जुन्या धोकादायक अवस्थेतील शाळेच्या इमारतीला लागलेली घरघर पाहून मन सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही. या इमारतीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. वरचा पत्रा खराब झाला आहे. ही धोकादायक इमारत आता पडेल का मग पडेल? अशा गंभीर स्थितीत आहे. या शाळेसाठी दोन शिक्षकांची मंजूरी आहे. मात्र शाळाखोली एकच आहे. त्यामुळे शाळेच्याही दोन खोल्या आवश्‍यक आहेत.
शिक्षण प्रशासनाने याची दखल घेऊन ही धोकादायक इमारत पाडून त्याजागी नवीन इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे.

धोकादायक इमारत तसेच शौचालय संदर्भातील दुरूस्तीचे प्रस्ताव पाटण येथील गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत. वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे. तसेच येथे दोन शिक्षक पदे मंजूर असल्याने दोन वेगवेगळ्या वर्ग खोल्यांची आवश्‍यकता आहे.

प्रकाश गोरड मुख्याध्यापक 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here