पिंपरी – मनातल्या गुलाबी भावनांना वाट करून देत पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. मात्र, मागील वर्षी याच दिवशी पुलवामाची दुर्दैवी घटना घडल्याने सोशल मीडियावर शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सकाळपासूनच लाल गुलाब देत आवडत्या व्यक्तीसोबत शहरातील कॅफे, रेस्टॉरंट, हॉटेल, क्लबसह एकांतातील पर्यटनस्थळी जाऊन तरुणाईने आपल्या नात्यांची वीण अधिक घट्ट केली. पिंपरी कॅम्प परिसर, चिंचवडगाव, भोसरी तसेच शहरातील विविध भागांत लाल गुलाब, हार्टशेपचे फुगे, विविध आकारातील चॉकलेट्स व गिफ्टची तरुणाईने खरेदी केली.
व्हॅलेंटाइन स्पेशल चॉकलेट, स्ट्रॉबेरी, फ्रूट केकस, व्हाइट फॉरेस्ट, ब्लॅक फॉरेस्ट, हार्ट शेप अशा विविध प्रकारच्या फ्लेवर्सच्या केकचा आस्वाद घेत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. शहरातील विविध मॉल्समध्ये अनेक ऑफर्स देण्यात आल्या होत्या. त्याचा लाभ घेत अनेकांनी वस्तू खरेदीचा आनंद लुटला. रात्री उशिरापर्यंत व्हॅलेंटाइन डे चा फिव्हर दिसून आला. या वेळी पोलिसांकडून टवाळखोरांना समज देण्यात आल्याचे चित्र काही ठिकाणी पहायला मिळाले.
किमतीत वाढ
विक्रेत्यांनी फुगे, केक, पेस्ट्रीचे दर वाढविले होते. गुलाबाचे फूल 40 ते 50 रुपये तर हार्ट शेपचे फुगे 25 ते 30 रुपयांना विकले गेले. एरवी 30 ते 40 रुपयांना मिळणारी पेस्ट्री मात्र 60 ते 70 रुपये दराने खरेदी करण्यात आली. त्यामुळे प्रेमाच्या या दिवशी अनेकांना महागाईची झळ बसली.
सोशल मीडियावर मात्र “ब्लॅक डे’
शहरात सर्वत्र व्हॅलेंटाईन डे साजरा होत असताना सोशल मीडियावर मात्र ब्लॅक डे निमित्त पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अनेकांनी डीपी व आपल्या व्हॉट्सऍप स्टेटसला जरा याद करो कुर्बानी गीताद्वारे शहीद जवानाचे स्मरण करून आदरांजली वाहिली.