नवी दिल्ली : देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर आहे. तर विरोधकांकडून एकच उमेदवार उभा करण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाणार असल्याचा चर्चांना उधाण आले आहे. मात्र आता खुद्द शरद पवारांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांच्या नावाची दिल्लीत जोरदार चर्चा आहे. त्याच पार्श्ववभूमीवर मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत शरद पवारांनी आपण विरोधकांचे उमेदवार नसू असे स्पष्ट केले आहे. याविषयी बोलताना त्यांनी “मी शर्यतीत नाही. मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाही,” असे म्हटले आहे.
राज्यात काँग्रेसने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांचे नाव समोर येताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. तसेच “महाराष्ट्राचा व्यक्ती देशाचा राष्ट्रपती होत असेल आणि शरद पवार यांचे नाव पुढे आले तर महाराष्ट्र काँग्रेस त्यांच्याबरोबर आहे”. असेही म्हटले होते.राष्ट्रवादीच्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार विरोधकांमध्ये चर्चा व्हावी यासाठी पुढाकार घेणार आहेत. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, गुलाम नबी आझाद यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसने पसंती दर्शवली आहे.
दुसरीकडे राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. येत्या १५ जून रोजी विरोधकांची दिल्ली येथे बैठक होणार आहे. या बैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी बिगर भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच २२ विरोधी पक्षाच्या नेत्यांना बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. तसेच राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून कोण उमेदवार असेल यावरदेखील या निवडणुकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. देशाच्या नव्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी निवडणूक आयोगाने १८ जुलै रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर केले आहे. या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया २१ जुलै रोजी पार पडेल.