पिंपरी (प्रतिनिधी) – सार्वजनिक रस्त्यावर अंमली पदार्थांचे सेवन करून एका तळीरामाने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. तसेच संपूर्ण कुटुंबाला संपविण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 12) मध्यरात्री साडेबारा वाजता तुपे वस्ती मोशी येथे घडली.
पोलीस नाईक बिराप्पा दत्तू बनसोडे यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महादेव दत्तात्रय खंडागळे (वय 40, रा. राजगुरूनगर, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुपे वस्ती मोशी येथे आरोपी महादेव अंमली पदार्थांचे सेवन करून सार्वजनिक रस्त्याच्या बाजूला एका व्यक्तीला धक्काबुक्की करून आरडाओरडा करत होता. त्यावेळी पोलीस नाईक बनसोडे तिथून जात होते. त्यांनी आरोपी महादेव याला विचारणा केली असता त्याने बनसोडे यांना मारहाण केली.
त्यानंतर बनसोडे यांनीही महादेव याला वैद्यकीय तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात नेले. केस पेपर काढण्यासाठी जात असताना महादेव याने बनसोडे यांना ‘तू माझ्यावर गुन्हा दाखल केला तर मी तुझ्या कुटुंबाला संपवून टाकतो’ असे म्हणत शिवीगाळ करून ‘तुझी विकेटच टाकतो’ असे म्हणून बनसोडे यांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.