पिंपरी, दि. 12 (प्रतिनिधी) – दिवाळीच्या काळात प्रवाशांकडून अवाच्या सवा भाडे आकारणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक, टप्पा वाहतुकीसह नागरिकांची लूट करणाऱ्या खासगी बसेसची राज्य परिवहन विभागाने तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात आरटीओने तीन वायुवेग पथके नेमली आहेत. नियमभंग करणाऱ्या बसेसवर धडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिला आहे.
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या दिवाळीच्या सणासाठी अनेक नागरिक आपल्या मूळ गावाकडे जात असतात. गावाकडे जाण्यासाठी काही जण महाराष्ट्र शासनाची लालपरी, शिवनेरी, शिवशाहीने प्रवास करण्यास पसंती देतात. तर काही जण खासगी वाहनांतून प्रवास करतात. सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संख्येत वाढ झाल्याचा गैरफायदा घेत खासगी बस प्रवाशांकडून अवाच्या सवा दर आकारून लूट करतात. अवाजवी भाडे आकारणाऱ्या चालक-मालकांवर कारवाई करण्याचा निर्णय परिवहन आयुक्त कार्यालयाने घेतला आहे. याबाबतचे राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना आदेश देण्यात आले आहेत. 23 ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात बस तपासणी मोहीम राबविली जाणार आहे.
परिवहन विभागाच्या या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शहर परिसरात तीन वायुवेग पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकामध्ये दोन मोटार वाहन निरीक्षक, एक सहायक मोटार वाहन निरीक्षक हे अधिकारी आहेत. रात्री आणि पहाटेच्या वेळी या पथकांकडून गस्त घालण्यात येत आहे. बस तपासणीमध्ये दोषी आढळल्यास संबंधित बसेसवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पिंपरी-चिंचवड कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात चार ते पाच दिवसांपूर्वी खासगी बसचा अपघात झाल्यानंतर बसला आग लागली. यामध्ये 10 जणांचा जळून मृत्यू झाला. तर बुधवार (दि.12) रोजी पहाटे भीमाशंकरला एका खासगी बसचा अपघात झाला. सुदैवाने बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. त्यामुळे नियम मोडणाऱ्या आणि जास्त प्रवाशी भरणाऱ्या खासगी बसकडे पिंपरी-चिंचवड आरटीओने मोर्चा वळविला आहे.
प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेसची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी तीन पथके तयार करण्यात आली असून, महत्त्वाच्या मार्गावर गस्त वाढविण्यात आली आहे. नियमभंग करणाऱ्या बसेसवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दररोज 20 ते 25 बसेसवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच खासगी बस मालक-चालकांनी नियमांचा भंग करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
– अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड