Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. येत्या २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींना निमंत्रण देण्यात आली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातील नागरिक उत्सुक आहेत. मात्र देशभरासह जगभरात अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची चर्चा सुरू आहे. इतकेच काय तर या सोहळ्यापूर्वी अमेरिकेत भव्य मंदिराचे मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.
युनायटेड स्टेट्समधील हजारो मैलांच्या अंतरावरील 10 पेक्षा जास्त राज्यांमध्ये होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. विश्व हिंदू परिषद, यूएस चॅप्टरने संपूर्ण अमेरिकेतील हिंदूंच्या सहकार्याने 10 राज्यांमध्ये 40 हून अधिक होर्डिंग्ज लावले आहेत. एवढेच नाही तर कॅलिफोर्निया तसेच वॉशिंग्टन, शिकागो आणि अमेरिकेतील इतर शहरांमध्येही कार रॅली काढण्यात येणार आहे.
Vishwa Hindu Parishad (VHP) of America across the United States, placed more than 40 billboards displaying messages of the Ram Mandir ‘Pran Pratishtha’ in Ayodhya on January 22. pic.twitter.com/gpqO25i5IQ
— ANI (@ANI) January 12, 2024
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये 21 जानेवारी रोजी राम रथयात्रेचे आयोजन करण्यात आले असून त्यात संपूर्ण युरोपातून एक हजार लोक जमणार आहेत. उत्तर अमेरिकेपासून कॅनडापर्यंतच्या मंदिरांमध्ये पूजा आणि दिव्यांचा उत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या राम मंदिराच्या स्थापनेचे रामभक्तांचे स्वप्न प्रदीर्घ संघर्षानंतर आता साकार होणार आहे. अशा परिस्थितीत जगभरातील राम भक्त आपापल्या पद्धतीने हा सोहळा साजरा करत आहेत. त्यादरम्यान 21 जानेवारी 2024 रोजी पॅरिसमध्ये राम रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सोशल मीडियावर पॅरिसमध्ये राहणाऱ्या अविनाश मिश्रा नावाच्या युजरने राम रथयात्रेची माहिती शेअर करत पॅरिसमधील राम रथयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
टाईम्स स्क्वेअरवर अयोध्येतील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण
22 जानेवारी रोजी न्यूयॉर्क शहरातील टाईम्स स्क्वेअर येथे प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही होणार आहे. यापूर्वी 5 ऑगस्ट 2020 रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने टाइम्स स्क्वेअरवर राम मंदिराचा डिजिटल होर्डिंग चालवण्यात आले होते.