पिंपरी, दि. 20 – गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत मनसेचे प्रमूख राज ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेला जाण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील मनसैनिक देखील सज्ज झाले आहेत. शहरातून तीन हजार पदाधिकारी, कार्यकर्ते मुंबईला बुधवारी (दि. 22) रवाना होणार आहेत. त्यासाठी शहरात प्रत्येक विधानसभा निहाय बैठका पार पडल्या असून शहरात मनसेच्या वतीने फ्लेक्सबाजी करत सभेसाठी वातावरण निर्मिती देखील केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची दरवर्षी गुढीपाडव्याला मुंबईत सभा आयोजित केली जाते. पक्षाच्या वतीने राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते या सभेला जमतात. पिंपरी-चिंचवडमधूनही मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने जातात. यंदाच्या वर्षी देखील मनसैनिक सज्ज झाले असून सर्व तयारी पुर्ण करण्यात आली असल्याचे पदाधिकारी सांगत आहेत. सभेच्या तयारीची नुकतीच एक बैठक घेण्यात आली. या मध्ये मनसेचे नेते बाबू वागस्कर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा निहाय पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठका पार पडल्या. यामध्ये योग्य त्या सुचना देण्यात आल्या.
पक्षाच्या वतीने तीन हजार पदाधिकारी, कार्यकर्ते घेऊन जाण्याचा चंग बांधण्यात आला आहे. त्यांच्यासाठी पक्षाच्या वतीने बसची देखील सुविधा देण्यात आली आहे. यासह सभेची वातावरण निर्मिती करण्यासाठी प्रत्येक प्रभागात सभेचा एक फ्लेक्स लावण्यात आला आहे. 22 मार्च रोजी सकाळी कार्यकर्ते रवाना होणार आहेत.
प्रतिक्रिया :
सभेसाठी शहरातून तीन ते साडे तीन हजार पदाधिकारी, कार्यकर्ते आम्ही घेऊन जाणार आहे. त्यांची सर्व सुविधा पक्षाकडून करण्यात येणार आहे. तसेच शहरात फ्लेक्स लावण्यात आले आहे. बैठका घेऊन बाकीची तयारी पूर्ण केली आहे.
– सचिन चिखले, अध्यक्ष, मनसे, पिंपरी-चिंचवड