वेलिंग्टन – चार फलंदाजांनी केलेल्या जिद्दी अर्धशतकी खेळीनंतरही श्रीलंकेला यजमान न्यूझीलंडकडून सोमवारी दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 58 धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयासह न्यूझीलंडने दोन कसोटी सामन्यांची ही मलिका 2-0 अशी निर्विवाद जिंकली.
New Zealand win by an Innings and 58 runs, and clinch the series 2-0.#NZvSL pic.twitter.com/ZupKilnZ1I
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) March 20, 2023
न्यूझीलंडने आपला पहिला डाव 4 बाद 580 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर श्रीलंकेचा पहिला डाव 164 धावांवर गुंडाळलत त्यांना फॉलोऑनही दिला होता. त्यानंतर श्रीलंकेने आपला दुसरा डाव सुरू केल्यावर रविवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा 2 बाद 113 धावा केल्या व त्यांना डावाचा पराभव टाळण्यासाठी तब्बल 303 धावांची पिछाडी भरून काढायची होती.
त्यांच्या डावात दीमुथ करुणारत्नेने 51 तर कुशल मेंडीस 50 यांनी अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर दीनेश चंडीमल व धनंजय डीसील्व्हा यांनीही जबाबदारीने फलंदाजी केली. मात्र, चंडीमल 62 धावांवर बाद झाला. डीसील्व्हाने 98 धावांची तडफदार खेळी केली. त्याने शतक अवघ्या 2 धावांनी हुकले. तो बाद झाल्यावर निशान मधुष्काने 39 तर कासुन रजिथाने 20 धावांची खेळी करत थोडी लढत दिली. मात्र, ते संघाचा डावाने पराभव टाळू शकले नाहीत. त्यांचा डाव 358 धावांवर संपला व न्यूझीलंडने एक डाव आणि 58 धावांनी दणदणीत विजय मिळवला व मालिकाही खिशात घातली.
न्यूझीलंडकडून टीम साउदी व ब्लेअर थीकनर यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. मायकल ब्रेसवेलने 2 बळी मिळवले. डग ब्रेसवेल व मॅट हेनरी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. न्यूझीलंडचा केन विल्यमसन मालिकेचा तर हेनरी निकोलस सामन्याचा मानकरी ठरला.
संक्षिप्त धावफलक –
न्यूझीलंड पहिला डाव – 4 बाद 580 धावा. घोषित. श्रीलंका पहिला डाव – सर्वबाद 164.
श्रीलंका दुसरा डाव – 142 षटकांत सर्वबाद 358 धावा. (धनंजय डीसील्व्हा 98, दीनेश चंडीमल 62, दीमुथ करुणारत्ने 51, कुशल मेंडीस 50, निशान मधुष्का 39, कासुन रजिथा 20, टीम साउदी 3-51, ब्लेअर थीकनर 3-84, मायकल ब्रेसवेल 2-100, डग ब्रेसवेल 1-58, मॅट हेनरी 1-59).