पुणे – पुणे मुक्कामी दोन दिवसांसाठी येणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी महापालिका प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. या दोन दिवसांच्या कालावधीत महापालिकेचे शहरातील सर्व रुग्णालयांत मोफत आरोग्य सेवा देणार आहेत. तर पालखी मार्गावरील 134 रुग्णालयात प्रत्येकी 10 टक्के बेड वारकऱ्यांसाठी राखीव असणार आहेत.
या शिवाय, महापालिकेचे तब्बल 200 पेक्षा अधिक वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह 21 रुग्णांलयात विशेष सुविधा असणार आहे. दोन दिवसांच्या मुक्कामात शहरात सार्वजनिक स्वच्छता तीन वेळा केली जाणार आहे, स्वच्छतागृहांचाही त्यात समावेश आहे. तर स्वच्छतेच्या कामासाठी 800 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 3100 मोबाइल टॉयलेटची सुविधा असणार आहे. या शिवाय, पूर्ण पालखी मार्गावर महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, वारकऱ्यांसाठी पाणी, फॅन, खुर्ची तसेच वैद्यकीय सुविधाही असणार आहे.
दरम्यान, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह शुक्रवारी सायंकाळी पाहणी करीत कामाचा आढावा घेतला. या शिवाय, महापालिकेने अग्निशमनदलाच्या कर्मचाऱ्यांच्या सट्ट्याही रद्द केल्या असून नदीपात्राच्या परिसरात जीव रक्षक तैनात करण्यात येणार आहेत.
अशी आहे तयारी..
- 21 दवाखान्यांत मोफत वैद्यकीय सेवा
- 3100 मोबाइल टॉयलेट
- 21 ठिकाणी वैद्यकीय पथके
- 800 स्वच्छता कर्मचारी
- पालिकेच्या 3 रुग्णवाहिका
- 108 सेवेच्या 25 रुग्णवाहिका
- खासगी 12 रुग्णवाहिक
- पुणे-पंढरपूर स्वतंत्र फिरता दवाखाना
- मांस, मासळीची दुकाने बंद
- ठिकठिकाणी “ओआरएस’ची सुविधा
- मुक्कामांच्या ठिकाणी मांडव व्यवस्था
- शहरात ठिकठिकाणी नळकोंडाळी
- मुक्कामी भागात 24 तास पाणीपुरवठा
- कीटक प्रतिबंधात्मक औषध फवारणी
- पालखी मार्गावरील रस्त्यांची कामे पूर्ण
- अतिक्रमण विभागाची फिरती पथके