वाघोली -पुणे-नगर महामार्गालगत वाघोलीतील तीन एकर जागेमध्ये प्रस्तावित हवेली तालुक्याच्या आयटीआयचा बांधकाम आराखडा शासकीय वास्तूविशारद विभागाने तयार केला असून, बांधकाम विभागाचे इस्टीमेट, प्रशासकीय मान्यतेनंतर लवकरच डीपीडीसी राखीव फंडातून आयटीआयच्या प्रशस्त इमारतीच्या बांधकामाला गती मिळणार आहे. रखडलेला हा प्रश्न लवकरच सुटणार आहे.
हवेलीचे आयटीआय अनेक वर्षांपासून पेरणे फाटा येथे भाडेतत्वावर बिकट अवस्थेत सुरू आहे. यासाठी 2013मध्ये वाघोलीतील तीन एकर गायरान जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने दिली. याची मोजणी केली असता जागा कमी पडत होती. प्रशासनाने सक्तीने मोजणी करून जागा आयटीआयच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला होता; मात्र गार्डन, पंप हाऊस असल्यामुळे ग्रामस्थांनी विरोध केला. जिल्हाधिकाऱ्यांनी इतर गायरान गटातील मिळून 3 एकर जागा आयटीआयसाठी दिली.
या जागेसाठी हवेली आयटीआयचे प्राचार्य व वाघोलीतील आरटीआय कार्यकर्ते किशोर सातव यांनी पाठपुरावा केला. शासकीय वास्तूविशारद विभागाने आयटीआयसाठी प्रस्तावित आराखडा तयार केला आहे. यात मुख्य शैक्षणिक इमारत, मुलांचे वसतिगृह, शिक्षकांसाठी रहिवासी इमारत प्रस्तावित केले आहे. बांधकाम विभागाकडून इस्टीमेट आयटीआयला सादर केले जाणार आहे.
मान्यतेनंतर राखीव डीपीडीसीच्या फंडातून कामाला सुरुवात होणार आहे. पुणे विभागाचे मुख्य वास्तुविशारद चेतन आकरे, बांधकाम विभागाचे उपअभियंता कुलकर्णी, मंडलाधिकारी किशोर शिंगोटे, प्राचार्य संतोष गोसावी, किशोर सातव यांनी प्रस्तावित जागेची पाहणी केली आहे.
अथक संघर्षानंतर वाघोलीतील हवेली तालुका आयटीआयच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला. बांधकाम आराखडा तयार झाला असल्याने लवकरच प्रशासकीय मान्यतेनंतर बांधकामाला सुरुवात होईल. बांधकाम पूर्ण होण्यासाठी 3 वर्षांचा कालावधी लागू शकतो. आयटीआय झाल्यानंतर वाघोलीच्या वैभवात भर पडणार आहे.
-किशोर सातव, आरटीआय कार्यकर्ते.