पुणे – “मुंबई, पुणेसह राज्यातील मुदत संपलेल्या सर्व पालिकेच्या निवडणुका आम्हाला हव्या आहेत. आम्ही तयारीत आहोत. आम्ही (भाजप) कुठल्याही निवडणुका थांबवलेल्या नाहीत सर्व मिळून निवडणूक घेण्याची मागणी आयोगाकडे करू,’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात स्पष्ट केले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र, मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवडचे दौरे केल्याने ही तयारी लोकसभेसाठी की महापालिकेसाठी? अशी चर्चा असतानाच ऑक्टोबरमध्ये महापालिकेच्या निवडणुकाही होऊ शकतील, असेही धुमारे पुन्हा फुटू लागले आहेत.
महापालिका निवडणुका का रखडल्या आहेत? या प्रश्नावर उत्तर देताना अधिवेशनात फडणवीस यांनी “आमची तयारी झाली’ असल्याचे स्पष्ट सांगितल्याने त्यांच्या या वक्तव्यातून पालिका निवडणुका लवकरच घेतल्या जातील, असे सूचित होत असल्याचे जाणकारांनी सांगितले. महापालिका 1888 कलम 18 (1) अन्वये महापालिकेच्या सर्व निवडणुका घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे.निवडणूक आयोगाने 4 ऑगस्ट 2022 अन्वये महापालिकेला सार्वत्रिक प्रक्रिया थांबविण्याचे आदेश असले तरी राज्यातील सुमारे 2,620 ग्रामपंचायतीमधील 3,666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांची पोटनिवडणूक आयोगाने दि. 18 मे 2023ला घेतली होती.
तर, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह मनपा निवडणुका म्हणजेच ऑक्टोबर 2023मध्ये होऊ शकतील, असे सूचित करण्यात आले होते. 2024 मध्ये निवडणूक आयोगावर लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांचा मोठा ताण असणार आहे. यामुळेच चालू वर्षांत महापालिका निवडणूक घेण्याचा निर्णय आयोग घेऊ शकते, त्यातच भाजपच्या मोठ्या नेत्यांचे दौरे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य पाहता निवडणुकांचा बार दिवाळीच्या आसपास फुटण्याची चर्चा आहे.
विशेष बैठकीतही चर्चा?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शाह यांची जे. डब्ल्यू मेरिएट हॉटेलात विशेष भेट घेतली. यावेळी या चारही नेत्यांची 40 मिनिटे चर्चा झाली. राज्यातील राजकीय घडामोडींसह रेंगाळलेली महापालिका निवडणूक आणि राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरही चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.