मारियुपोल – रशियाने युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धामध्ये आतापर्यंत हजारो निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. युक्रेनची राजधानी कीव्ह ताब्यात घेण्यासाठी रशियन सैनिकांनी हल्ले तीव्र केले आहेत. तर युक्रेनी सैनिक आपली इंच इंच जमीन वाचवण्यासाठी प्राणापणाने लढतायेत.
रशिया युक्रेनच्या भूमीवर माजवत असलेल्या विध्वंसाची छायाचित्र रोज समोर येताहेत. अशीच काळीज पिळवटून टाकणारी छायाचित्र युक्रेनमधील मारियुपोल शहरातून समोर आली आहेत. येथे असलेल्या एका प्रसूती व बाल रुग्णालयावर रशियाने बॉम्ब हल्ला केला आहे.
या हल्ल्यावेळी येथे गर्भवती महिला प्रसूतीसाठी दाखल होत्या. बॉम्ब हल्ल्यात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. बॉम्ब हल्ल्यानंतर मारियुपोल येथे असलेल्या या प्रसूती व बाल रुग्णालयाचे रूपांतर स्मशानभूमीत झालेय. रुग्णालयाच्या काही इमारती पूर्णपणे जमिनोदोस्त झाल्या आहेत तर काही इमारतींच्या काचा फुटल्या आहेत, बेड्स, पडदे, वैद्यकीय सामग्री जाळून खाक झाली आहे.
अशातच बॉम्ब हल्ल्यानंतर इमारती कोसळल्याने झालेल्या राडारोड्यातून आपल्या पोटातील गोळ्यासह वाट काढत बाहेर पडणाऱ्या मारियाना विशेगिरस्काया या गर्भवती युक्रेनियन महिलेचा फोटो जगभरात व्हायरल झाला आहे. युक्रेन ताब्यात घेण्याचे भूत रशियाच्या मानगुटीवर असे स्वार झाले आहे की आपण कोणत्या प्रकारचा विध्वंस करतोय हे देखील त्यांना कळत नसल्याचं मत सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येत आहे.
मारियाना विशेगिरस्काया ही महिला या बॉम्ब हल्ल्यातून बचावली असून दुसऱ्याच दिवशी तिने एका कन्येला जन्म दिला आहे. हल्ला झालेल्या हॉस्पिटलमधून बाहेर पडताना मारियानाचे तोंड रक्ताने माखले होते. गर्भवती असताना देखील तेथून लवकरात लवकर बाहेर पडण्याची लगबग तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
एका हातात पिशवी, अंगावर ओढलेली चादर, रक्ताने माखलेलं तोंड अशा अवस्थेत मारियानाचे टिपलेले छायाचित्र जगभरात व्हायरल झाले आहे. रशियाने हा विध्वंस थांबवावा असे मत नेटकरी व्यक्त करतायेत. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीमध्ये युक्रेनचे राजदूत सर्गी किसलीस्ता यांनी मारियानाच्या मुलीचे नाव व्हिरोनिका ठेवले असल्याचे सांगितले.