नवी दिल्ली -पंजाबची सत्ता काबीज केल्याने उत्साह दुणावलेल्या आम आदमी पक्षाने (आप) आता दक्षिणेकडेही कूच करण्याचे ठरवले आहे. तो पक्ष लवकरच तेलंगण, आंध्रप्रदेश, तामीळनाडू, केरळ, पुदुचेरी, लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबार बेटांमध्ये व्यापक सदस्य नोंदणी मोहीम सुरू करणार आहे.
आपचे नेते सोमनाथ भारती यांनी पक्षाच्या नव्या संकल्पाची माहिती दिली. पंजाबमधील यशानंतर आपविषयीचे आकर्षण दक्षिणेकडील राज्यांमध्ये वाढल्याचे संकेत मिळत आहेत. तेथील जनतेचा मूड ध्यानात घेऊन पक्षाने सदस्य नोंदणी मोहीम सुरू करण्याचे ठरवले आहे.
दक्षिणेकडील राज्यांत पक्ष टप्प्याटप्प्याने पदयात्राही काढेल, असे त्यांनी सांगितले. दक्षिणेकडील राज्यांत आधीपासूनच आपच्या प्रदेश शाखा आहेत. मात्र, त्या पक्षाचे तेथील अस्तित्व माफक स्वरूपाचेच आहे.
आपने 2018 मध्ये कर्नाटक आणि तेलंगण विधानसभा निवडणुका लढवल्या. मात्र, खातेही उघडता न आल्याने आपची वाढ खुंटली. आता पंजाबमधील निकालाने आपची चांगलीच राजकीय हवा झाली आहे. त्याचा लाभ उठवून दक्षिणेकडे विस्तारण्याचा चंग त्या पक्षाने बांधला आहे.