पिंपरी – पारपत्रासाठी (पासपोर्ट) पिंपरी चिंचवड शहरात पासपोर्ट सेवा केंद्राने टपाल विभागाच्या पिंपरी पीएफ कार्यालयात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची चांगली सोय झाली असून येथे दिवसाला किमान 70 ते 80 अर्ज येतात.
परदेशी प्रवासासाठी पासपोर्ट महत्त्वाचे आहे. त्याचा वापर ओळखपत्र म्हणूनही केला जातो. पासपोर्ट असेल तर इतर कागदपत्रांची गरज लागत नाही. तसेच पासपोर्टशिवाय परदेशी प्रवासही करता येत नाही. पूर्वी पासपोर्टच्या कोणत्याची कामासाठी पुण्यात जावे लागत होते. आता टपाल विभागाच्या पीएफ कार्यालयात याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांचा संपूर्ण दिवस व पैसे या दोन्हींची बचत झाली आहे. या कार्यालयात पासपोर्टची सर्व कामे केली जातात. यात नवीन पासपोर्ट काढणे, नूतनीकरण, पत्ता बदलणे आदींचा समावेश आहे.
पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करून अपाइंटमेंट घ्यावी लागते. ऑनलाइन भेट घेतल्यानंतर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बाणेर येथील पासपोर्ट सेवा केंद्र किंवा पिंपरीतील पीएफ कार्यालयात जावे लागेल. तेथे सर्व कागदपत्रे अपलोड केली जातात. मूळ कागदपत्रांसह अर्ज पूर्ण भरल्यावर तो अपलोड होतो. येथे रोज सुमारे 70 ते 80 अर्ज भरले जातात, असे जनसंपर्क अधिकारी के.एस. पारखी यांनी सांगितले. ते म्हणाले की, पूर्वी पुण्यात सुविधा होती. काही वर्षांपासून पिंपरी पीएफ कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेथे रोज 70 ते 80 अर्ज येतात. अर्ज अपलोड झाल्यावर त्यांचे व्हेरीफिकेशन बाणेर येथील कार्यालयात होते. करोनाकाळात कार्यालय बंद होते. सप्टेंबर 2021 पासून ते पुन्हा सुरू झाले आहे.