केरळमध्ये संततधार पावसामुळे पूरस्थिती

थिरुवनंतपूरम  – केरळमध्ये संततदार पाऊस सुरू असल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. प्रामुख्याने दक्षिण आणि मध्य केरळमध्ये पूरस्थिती अधिक गंभीर बनली आहे. पुराचे पाणी रस्त्यावर साचल्यामुळे आणि नद्यांना पूर आल्यामुळे धोक्‍याचा इसारा देण्यात आला आहे.

 आणखीन पावसाची शक्‍यता असल्यामुळे पठाणमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की आणि त्रिशूर पाच जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. तिरुअनंतपुरम, कोल्लम, अलाप्पुझा, पलक्कड, मलप्पुरम, कोझीकोड आणि वायनाड जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा “ऑरेंज’ इशारा जारी करण्यात आला आहे. 

केरळच्या किनारपट्टी नजिक अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे 17 ऑक्‍टोबरपर्यंत केरणमध्ये अनेक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार आणि काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. केरळचे मुख्यमंत्री पीनारयी विजयन यांनी नागरिकांना सतर्कतेचा इसारा दिला आहे.

 केरळच्या दक्षिण आणि पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पूराची पातळी काही ठिकाणी धोक्‍याच्या पातळीकडे वाढत चालली आहे. काही धरणांची पातळीही वाढत असल्यामुळे नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणलोटक्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी सावधगिरीच्या सूचनांकडे लक्ष द्यावे, असे मुख्यमंत्र्यांनी फेसबुकवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

चंपाकमंगलम येथे पावसामुळे एक भिंत पडली. मात्र त्याखाली अडकलेली दोन मुले आश्‍चर्यकारकरित्या बचावली आहेत. नदीकाठच्या पर्यटनक्षेत्रांना भेट देऊ नये असे आवाहन पर्यटकांना करण्यात आले आहे. पूराच्या पाण्यात आतापर्यंत 12 जण बेपत्ता झाले आहेत. राज्य सरकारच्या विनंतीवरून लष्कर आणि हवाई दलाची हेलिकॉप्टर मदत कार्यासाठी तयार ठेवण्यात आली आहेत.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.