देरना (लीबिया) – लीबियामध्ये दोन धरणे फुटल्यानंतर आलेल्या महापूरांनतर बेपत्ता झालेल्या शेकडो जणांचा अजूनही शोध लागलेला नाही. या पूराला एक आठवडा उलटून गेला तरी अजूनही या शहरातील तब्बल 10 हजार जण बेपत्ता असून लीबियाच्या प्रशासनाने या नागरिकांच्या सोधासाठी मोहीम हाती घेतली आहे. डॅनिएल या चक्रिवादळाच्या प्रभावामुळे लीबियाच्या पूर्व भागामध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे दोन धरणे एकापाठोपाठ एक फुटल्यामुळे हा महापूर आला होता. (Libya flooding )
लिबियन रेड क्रेसेंटच्या म्हणण्यानुसार 10 हजाराहून अधिक लोक बेपत्ता आहेत. पूराच्या सहा दिवसांनंतर शोधकर्ते अजूनही चिखल आणि रहिवाशांनी सोडून दिलेल्या इमारतींमध्ये खोदकाम करत असून मृतदेह आणि संभाव्य वाचलेल्यांचा शोध घेत आहेत. रेड क्रेसेंटने आतापर्यंत 11 हजार 300 मृत्यूची पुष्टी केली आहे. समुद्राच्या पाण्याबरोबर अनेक मृतदेह किनाऱ्यावर येत आहेत. त्यांची संख्या खूप जास्त आहे.
ज्यांनी त्यांचे कुटुंब गमावले त्यांच्यासाठी तातडीच्या मानसिक आधारासह मोठ्या प्रमाणात मदतीची अजूनही गरज होती. शोध आणि बचाव प्रयत्न आणि मदत वाटपाच्या समन्वयामध्ये काही प्रगती असूनही मृतदेहांचे दफन करणे हे एक महत्त्वाचे आव्हान आहे, बचावकर्त्यांना शुक्रवारी बरेच मृतदेह सापडले आणि ते अजूनही शोधत आहेत, असे डॉक्टर विदाउट बॉर्डर्स या मदत गटाने सांगितले.
धरणे फुटण्याची करणे तपासणार
लीबियातील प्रशासनल दोन धरणांच्या पडझडीची तसेच देखभाल निधीच्या वाटपाची चौकशी केली जाणार आहे. ही दोन्ही धरणे 1970 च्या दशकात बांधली होती. शहरातील स्थानिक अधिकारी आणि पूर्वीच्या सरकारमधील अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाणार आहे, असे लिबियाचे जनरल प्रॉसिक्युटर अल-सेदिक अल-सूर यांनी सांगितले. “नाटो’च्या सैन्याने 2011 मध्ये लीबियाचे हुकुमशहा मोअम्मर गद्दाफी यांची सत्ता ुलथवून लावल्यापासून तेथे अराजक स्थिती आहे. त्यामुळे ही चौकशी नक्की कशी केली जाणार आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
लीबियातील पूरग्रस्त बागातून साथीच्या रोगांचा प्रसार आणि स्फोटक शस्त्रे चोरीला जाण्याबद्दल अधिकारी आणि मदत गटांनी चिंता व्यक्त केली आहे.