मुंबई – अभिनेता प्रसाद ओकचा ‘धर्मवीर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. धर्मवीर हा चित्रपट आनंद दिघे यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात प्रसाद ओकेने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. धर्मवीर या चित्रपटाला प्रेक्षकांनी देखील मोठा प्रतिसाद दिला होता. आता याच चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे.
धर्मवीरचे निर्माते मंगेश देसाई दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी नुकतंच जेजुरी येथे खंडोबाचे दर्शन घेऊन ‘धर्मवीर’च्या दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा केली. जेजुरी गडावरून दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी पोस्टरचे अनावरण देखील केल्याचे पाहायला मिळाले.
आता लवकरच धर्मवीर २ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. निर्माता मंगेश देसाई यांनी याबाबतची एक खास पोस्ट आपल्या सोशल मीडियावरून शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात,”धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 1 च्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं चरित्र सगळ्या जनतेसमोर आलं. धर्मवीर आनंद दिघे साहेब यामाध्यमातून सर्व जगात पोहोचले आणि ‘असा माणूस होणे नाही’ हेही सर्वांना समजलं. त्यांचा आयुष्यातील अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या जनतेसमोर येणं गरजचं आहे, म्हणूनच ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे – भाग 2 ह्याचं चित्रीकरण आम्ही सुरू करतोय, लवकरच…बघुया धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2.. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट.. लवकरच”
या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसाद ओकने अभिनय क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला होता.पहिल्या भागात मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे दाखवले होते. आता आनंद दिघेंची ही कथा पुढे कशी सरकते यासह या चित्रपटात आणखी कोण नवे कलाकार पाहायला मिळतात याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.