नवी दिल्ली :- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांचे दिल्ली सेवा विधेयकाच्या विरोधात संसदेत मतदान करून आम आदमी पक्षाच्या भूमिकेचे समर्थन केल्याबद्दल आभार मानले आहेत.
दोन कोटी दिल्लीकर जनतेच्या वतीने त्यांनी कॉंग्रेसचे आभार व्यक्त केले आहेत. केजरीवाल यांनी म्हटलं आहे की, “संसदेच्या आत तसेच संसदेबाहेर दिल्लीतील लोकांच्या हक्कांचे समर्थन केल्याबद्दल मी कॉंग्रेसचे मनापासून कौतुक करतो.
मला खात्री आहे की आमच्या संविधानाच्या तत्त्वावरील लढाईत तुमची अतुलनीय निष्ठा अनेक दशके स्मरणात राहील. राज्यघटनेचा अवमान करणाऱ्या शक्तींविरुद्धच्या लढाईत आम्ही यापुढेही तुमच्या पाठिंब्याची अपेक्षा करतो.
दिल्लीचे सेवा विधेयकावरील मतदानात 131 खासदारांनी कायद्याच्या बाजूने आणि 102 जणांना या प्रस्तावच्या विरोधात मतदान केल्यानंतर हे विधेयक मंजूर करण्यात आले. याद्वारे केंद्र सरकारने दिल्ली सरकारचे सरकारी सेवांवरील सर्व अधिकार संपुष्ठात आणून हे अधिकार त्यांनी आपल्या ताब्यात घेतले आहेत.