पुणे – क्रीडा भारती पुणे महानगरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या डॉक्टर हेडगेवार चषक आठव्या जलद बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या गटात प्रथमेश शेर्ला याला विजेतेपद मिळाले तर महिलांमध्ये तन्वी कुलकर्णी विजेती ठरली. प्रथमेश याने या स्पर्धेतील सात फेऱ्यांमध्ये साडेसहा गुणांसह निर्विवाद वर्चस्व गाजवले. केवल निर्गुण, मिहीर सरवदे व ओम लामकाने यांना अनुक्रमे दोन ते चार क्रमांक देण्यात आले. प्रियांशू पाटील याने पाचवा क्रमांक घेतला.
बिगर मानांकित खेळाडूंच्या गटात हर्ष मुथा, विश्वनाथ कोटे व अथर्व कोथुरवार हे पहिले तीन क्रमांकाचे मानकरी ठरले. महिलांमध्ये तन्वी कुलकर्णी, राजेश्वरी देशमुख व मानसी टिळेकर यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळविले. ज्येष्ठ खेळाडूंच्या विभागात प्रदीप कुलकर्णी, चंद्रकांत डोंगरे व अरुण सराफ यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविले. दहा वर्षांखालील गटात कविश लिमये, प्रसाद शितिज, एस.के.विनय सारेंगन यांना पहिली तीन पारितोषिके देण्यात आली तर चौदा वर्षाखालील गटात हा मान अनुक्रमे दक्ष मार्कन, चतुर्थी परदेशी व दिव्येशः साह यांना मिळाला.
या स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ग्रॅंडमास्टर अभिमन्यू पुराणिक व जनता बॅंकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर संदीप गानू यांच्या हस्ते व श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते फिडे प्रशिक्षक जयंत गोखले यांच्या उपस्थितीत झाले. बक्षीस समारंभ जनता बॅंकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर (मार्केटिंग) नीलेश देशपांडे स्पर्धेचे प्रायोजक मॅक्स लाईफ इन्शुरन्सचे सेंटर मॅनेजर शरद सुर्वे आणि असोसिएट सेल्स मॅनेजर विवेक बागडे वरीष्ठ अधिकारी यांच्या हस्ते झाला.
या वेळी क्रीडा भारतीचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष विजय पुरंदरे, पुणे शहराचे अध्यक्ष शैलेश आपटे, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष शकुंतला खटावकर, पुणे महानगराचे मंत्री विजय राजपूत, सह मंत्री भाऊसाहेब खुणे, कोषाध्यक्ष आनंद कंदलगांवकर उपस्थित होते. स्पर्धेचे प्रमुख आंतरराष्ट्रीय पंच म्हणून राजेंद्र शिदोरे तर सहाय्यक पंच म्हणून आंतरराष्टीय पंच दिप्ती शिदोरे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे सूत्रसंचलन क्रीडाभारतीचे संपर्कप्रमुख दीपक मेहेंदळे यांनी केले.