पिंपरी – सध्या पिंपरी चिंचवड शहरात पोलीस उपायुक्तांची दोन परिमंडळ आहेत. गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी तसेच पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी आणखी एक परिमंडळाची निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. येत्या 15 दिवसांत नवीन परिमंडळाला मंजूरी मिळण्याची शक्यता पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी व्यक्त केली. संदीप डोईफोडे आणि शिवाजी पवार या दोघांची नव्याने पोलीस उपायुक्त म्हणून पिंपरी चिंचवड शहरात 18 ऑगस्ट रोजी बदली झाली आहे. मात्र त्यांच्याकडे अद्याप कोणताच पदभार देण्यात आलेला नाही. याला कारण म्हणजे दोन परिमंडळ ऐवजी तीन परिमंडळ करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी गृहविभागाकडे सादर केला आहे. येत्या 15 दिवसांत या प्रस्तावाला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. ही मंजूरी मिळाल्यानंतरच नव्याने हजर झालेल्या पोलीस उपायुक्तांकडे पदभार देण्यात येणार आहे. सध्या दोन परिमंडळांमध्ये चार सहायक पोलीस आयुक्त कामकाज पाहतात. तिसऱ्या परिमंडळाची निर्मिती झाल्यावर सहा सहायक पोलीस आयुक्त असणार आहेत. यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून चार सहायक आयुक्त पदाच्या निर्मितीला मंजुरी मिळालेली आहे. मात्र याबाबतचा अध्यादेश काढण्यात आलेला नाही. लवकरच हा देखील अध्यादेश काढण्यात येईल, असेही पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले. लोकसंख्येच्या तुलनेत शहरातील गुन्हेगारी देखील वाढली आहे. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रभावी पोलिसिंग महत्वाचे आहे. सध्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांना कारवाई करताना मर्यादा येतात. मनुष्यबळाची संख्या वाढविण्यासाठी नुकतचे 720 पोलिसांची भरती प्रक्रिया पार पडली. या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांनी शहरात प्रत्यक्ष कामालाही सुरवात केली आहे. तसेच आगामी काळातही मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्याचे संकेत गृहमंत्र्यांनी दिले आहेत. अशी असणार परिमंडळाची रचना परिमंडळ – 1 सांगवी, काळेवाडी (प्रस्तावित), भोसरी, पिंपरी, चिंचवड, निगडी परिमंडळ – 2 वाकड, हिंजवडी, देहूरोड, शिरगाव, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी परिमंडळ – 3 चाकण, म्हाळुंगे, आळंदी, दिघी, एमआयडीसी भोसरी, चिखली