पुणे – पुणे- पिंपरी चिंचवड शहरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी “एमएसआरडीसी’ने रिंगरोड प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी भूसंपादन सुरू असताना दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष रिंगरोडचा आराखडा निश्चित करण्याचे काम सुरू आहे. हा रिंगरोड पाच टप्प्यांत होणार असून, या सर्व टप्प्यांचे काम एकाच वेळी सुरू केले जाणार आहे.
पश्चिम रिंगरोड हा कळवडे (ता.भोर) ते उर्से (ता. मावळ) असा सुमारे 65 किलोमीटर लांबीचा असेल. यावर 8 बोगदे असून, सुमारे 13 किलोमीटरचा प्रवास हा बोगद्यातून होणार आहे. रिंगरोडचे पूर्व आणि पश्चिम रिंगरोड असे दोन भाग आहेत. पूर्व व पश्चिम रिंगरोडची एकूण लांबी 136 किमी असून रुंदी सुमारे 110 मीटर इतकी असणार आहे. सध्यस्थितीत पश्चिम रिंगरोड काम गतीने सुरू आहे.
…म्हणून बोगद्यांचा पर्याय
या रिंगरोडला राज्य सरकारने “विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा दिला आहे. पश्चिम भागात डोंगर आहे. त्यामुळे डोंगराला वळसा घालून अथवा घाट करून रस्ता तयार करणे अडचणीचे होणार आहे. हे पाहता, रिंगरोडवरील प्रवास वेगाने व्हावा तसेच त्याची लांबी कमी असावी या उद्देशाने रिंगरोडवर बोगद्यांची आखणी केली आहे. महामार्गावर सहा इंटरचेंज असतील. त्यामुळे इतर मार्गांवर जाता येणार आहे. या रिंगरोडवर आठ बोगद्यांसह तीन छोटे आणि दोन मोठे पूल, तसेच खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरवरुन अर्धा किलोमीटर लांबीचा मोठा पूल अशी कामे होणार आहेत.
असा असणार मार्ग
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से (ता. मावळ) येथून सुरुवात. तेथून परंदवाडी – धामणे – बेबडओहोळ – चांदखेड – पाचाणे (ता.मावळ) – पिंपळोली- केमसेवाडी -जवळ- पडळघरवाडी- रिहे – मातेरेवाडी – घोटावडे – अंबडवेट- भरे – कासारआंबोली – उरावडे – आंबेगाव – मारणेवाडी – मोरेवाडी – भरेकरवाडी – कातवडी (ता. मुळशी) – बहुली- भगतवाडी -सांगरुण – मांडवी बुद्रुक – मालखेड – वरदाडे – खामगाव मावळ – घेरा सिंहगड – मोरदरवाडी – कल्याण – रहाटावडे (ता. हवेली) – रांजे- कुसगाव -खोपी- कांजळे- केळवडे (ता. भोर) येथील पुणे -सातारा महामार्गाला जोडला जाणार आहे.
रिंगरोडचे टप्पे- अंतर
पहिला टप्पा – 14 कि.मी.
दुसरा टप्पा – 20 कि.मी.
तिसरा टप्पा – 14 कि.मी.
चौथा टप्पा -7.50 कि.मी.
पाचवा टप्पा -9.30 कि.मी.