#प्रभात_व्हॉट्‌सअॅप_रिपोर्टर : समस्या तुमची, व्यासपीठ आमचे

पिंपरी-चिंचवड शहर वेगाने विस्तारत आहे. वाढते नागरीकरण, लोकसंख्या वाढ आणि तुलनेत कमी पडणाऱ्या सुविधा अशी परिस्थिती सध्या पाहण्यास मिळत आहे. नागरिकांना किमान मूलभूत नागरी सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, वीज आदी विषयांशी संबंधित छोटे-छोटे प्रश्‍न सुटावेत, अशीच सर्वसामान्यांची माफक अपेक्षा आहे. या समस्या मांडण्यासाठी आम्ही आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत.

नेरे येथे कचऱ्याचे साम्राज्य
नेरे – येथील भैरवनाथ मंदिराच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. मंदिर परिसर स्वच्छ असावा. जेथे स्वच्छता तेथे आरोग्य नांदत असते. परंतु परिसरातील नागरिक या ठिकाणी कचरा टाकत आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कचऱ्याच्या ढीगावर कुत्रे, मोकाट जनावरे यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. नेरे ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत आहे. परंतु कचऱ्याचे व्यवस्थापन करताना दिसत नाही. असे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र प्रशासन याकडे लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे असे वर्तन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
– जनार्दन पायगुडे, नागरिक


कचरा पेटविणाऱ्यांवर कारवाई करा
संभाजीनगर – शरदनगर येथे स्पाइन रोडच्या मधल्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर परिसरातील नागरिकांनी कचरा आणून टाकला आहे. स्मार्ट सिटी किती गहान आहे याचे दर्शन येथे आल्यानंतर होते. या मोकळ्या जागेत टाकलेला कचरा रात्री पेटवून दिला जातो. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. प्लॅस्टिक कचरा जाळणे कायद्याने गुन्हा आहे. परंतु या परिसरात रात्रंदिवस आग धगधगत असते. परंतु महापालिका प्रशासन याकडे लक्ष देताना दिसत नाही. किंवा तशी कारवाई करताना देखील दिसत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी आहे. कचरा पेटविल्याने वातावरणात उग्र वास येत आहे. ऑक्‍सिजन कमी पडत असल्याने श्‍वसनाचे आजार असणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथे कचरा टाकण्यास प्रशासनाने बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.


अंगणवाडी रस्त्याशेजारच्या पदपथावरील अतिक्रमण हटवा
चिखली – चिखलीतील मोरेवस्ती येथे अंगणवाडी रस्त्यावरील पदपथ गायब झाले आहेत. या पदपथांवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. काही ठिकाणी तर पदपथच शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे पाचऱ्यांना रहदारीच्या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. रस्ता मूळतःच अरुंद आहे. त्यात व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने मोठ्या गाड्या या रस्त्याने ये-जा करताना वाहतूककोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागाने कारवाई करून पदपथ मोकळे करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.