प्रभात रस्ता गल्ली नं. 6 : रस्ता रुंदीकरणाला विरोध; वेबसाइटवर नोंदवली हरकत

निवेदनासह पालिकेच्या वेबसाइटवर नोंदवली हरकत

पुणे – प्रभात रस्त्यावरील सहा नंबर गल्लीतील रस्ता रुंदीकरणाला तेथील रहिवाशांनी तीव्र विरोध केला असून, तसे हरकत नोंदवणारे पत्र त्यांनी महापालिका शहर अभियंता यांना दिले आहे. या गल्लीमध्ये 19 भूखंडधारक असून, या सगळ्यांनीच रस्ता रुंदीकरणाला विरोध केला आहे.

या रस्त्यावर रुंदीकरणासंबंधीची नोटीस महापालिकेने संबंधीत रहिवाशांना बजावली आहे. त्यावर हरकत घेऊन, रहिवाशांनी त्याला विरोध दर्शवला आहे. हा रस्ता “डेड एण्ड’ नसून, कोणत्याही दोन मोठ्या रस्त्यांना जोडणारा दुवाही नाही. त्यामुळे या रस्त्यावर रुंदीकरण करूनही त्याचा उपयोग नसल्याने रहिवाशांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

तसेच यातील बहुतांश भूखंड अलिकडेच विकसित झाले आहेत. तसेच काहींचे पुनर्निर्माण करण्यात आले आहे. ते पुनर्निर्मित करताना याठिकाणी पार्किंग आणि बांधकामासंबंधीचे सर्व नियम पाळण्यात आले आहेत. तसेच काही बंगलेधारकांना त्यांच्या घरांची पुनर्बांधणी करायची नाही. त्यात त्यांना स्वारस्यही नाही. तसेच रस्ता रुंदीकरणात मोबदल्यात मिळणारा एफएसआय किंवा टीडीआर त्यांना नको आहे. मुळात त्यांना रस्ता रुंदीकरणच नको आहे असे या पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. तसेच रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर तेथे दुकाने थाटली जातील, अनधिकृत प्रकारही होतील, त्यामुळे येथील रहिवाशांच्या सुरक्षा आणि शांततेस धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.

त्यामुळे सरसकट सगळ्या भागाची रस्ता रुंदी न करता जेथे गरज आहे आणि ज्यांना मान्य आहे तेथेच रस्तारुंदी करावी. प्रत्येक प्रकरण हे स्वतंत्रपणे हाताळावे. तसेच विरोध करणाऱ्या नागरिकांची संख्याही लक्षात घ्यावी आणि रस्तारुंदीकरण रद्द करावे, असेही या पत्रात नमूद केले आहे.

झाडे तोडू नका…
या भागात बंगल्यांच्या फ्रंटमार्जिनमध्ये अनेक जुनी, सुंदर वृक्षराजी आहे. ती झाडे तोडण्याच्या आम्ही विरोधात असून, पर्यावरणाची हानी होण्याला आमचा तीव्र विरोध आहे. तसेच या झाडांचा रहिवाशांनी अपत्याप्रमाणे सांभाळ केला आहे आणि करत आहे त्यांच्यावर निर्दयीपणे कुऱ्हाड चालवणे आम्हांला मान्य नाही, असेही येथील रहिवाशांनी या पत्रात नमूद केले आहे.

नेमके कोणाचे हित साधले जात आहे?
या भागाचे महापालिकेने “ट्रॅफिक सर्वेक्षण’ केले आहे. परंतु प्रत्येक प्रकरणानुसार हे प्रकरण हाताळावे. गल्ली नंबर सहाच्या बाबतीत रस्ता रुंदीकरणाचा पर्याय योग्य नाही. या रुंदीकरणाने नेमके कोणाचे हित साधले जात आहे, हे समजत नाही. परंतु महापालिकेने रहिवाशांच्या हिताचाही विचार करावा, असे या पत्रात म्हटले आहे. या पत्राशिवाय येथील प्रत्येक रहिवाशांनी स्वतंत्रपणे महापालिकेच्या वेबसाइटवर हरकत नोंदवली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.