पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गणेशखिंड रस्त्याच्या रुंदीकरणासाठी चापेकर पुतळा ते संचेती हॉस्पिटल या दरम्यान ४५ मीटर डी. पी. रस्ता रुंद करण्यात येणार आहे. त्यासाठी ही जागा सक्तीने संपादित केली जाणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावास स्थायी समितीत मान्यता देण्यात आली आहे. या भूसंपादनासाठी जवळपास १४४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. मंजूर विकास आराखड्यानुसार ४५ मीटर डी. पी. रस्ता रुंदीकरणासाठी जागा ताब्यात घेतली जाणार आहे.
चापेकर पुतळा ते संचेती हॉस्पिटल या दरम्यान रस्त्याची उजवी बाजू आणि डाव्या बाजूच्या बाधित मिळकतींचे भूसंपादन कायद्यान्वये संपादन करण्यात येणार आहे.
त्यासाठी महापालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाने बाधित मिळकतधारकांना तडजोडीने बाधित मिळकती ताब्यात घेण्याबाबत पत्र दिलेली आहेत.
तथापि, बाधित मिळकतधारकांनी तडजोडीने बाधित मिळकती ताब्यात देण्यास नकार दिल्याने मालमत्ता व व्यवस्थापन विभागाने नमूद मिळकती भूसंपादन कायद्याद्वारे संपादित केल्या जाणार आहेत.
या रस्त्याच्या डावी बाजूकडे बाधित क्षेत्र ७ हजार ०६७ चौरस मीटर क्षेत्राच्या एकूण २५ मिळकती, तर या रस्त्याच्या उजव्या बाजूकडे बाधित होणारे क्षेत्र ७ हजार ०६३ चौरस मीटर असून, एकूण २७ मिळकती आहेत.