पुणे – महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा एक अविभाज्य भाग बनलेला आणि कला-संस्कृती-परंपरा-सामाजिकतेचे प्रतिबिंब असलेला पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे देश-विदेशातील गणेशभक्तांसाठी आणि पर्यटकांसाठी मोठी पर्वणीच असते.
श्रीगणेश बनवा शाडूचा .. संदेश पर्यावरण रक्षणाचा .. (भाग-2)
बदलत्या काळात गणेशोत्सव अधिकच उत्सवी स्वरूपात होऊ लागल्याने अनेक पर्यावरणविषयक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे घरोघरी बसवली जाणारी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची गणेशाची मूर्ती आणि ही मूर्ती विसर्जन केल्यानंतर होणारे नदीचे प्रदूषण. ही समस्या टाळण्यासाठी दै. “प्रभात’ने यावर्षी “माणिकचंद’ प्रस्तुत “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ ही शाडूच्या मूर्ती बनवण्याची कार्यशाळा दि. 26 ते 30 ऑगस्टदरम्यान घेण्याचे ठरवले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील दहापेक्षा अधिक इंग्लिश मीडियम स्कूलमधल्या हजारो विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येणार असून या आगळ्या-वेगळ्या उपक्रमासाठी सहप्रायोजक म्हणून बांधकाम व्यवसायातील अग्रणी सिद्धिविनायक ग्रुप, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील पास्को एन्व्हायर्मेंटल सोल्युशन्स आणि महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि., तसेच श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि पुणे महानगरपालिका यांचे सहकार्य लाभले आहे. तसेच सुप्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे, नितीन ठाकरे आणि त्यांचे सहकारी विद्यार्थ्यांना शाडूची मूर्ती बनवण्याचे तंत्र शिकवणार आहेत. या मोहिमेचा शुभारंभ सोमवारी (दि.26) कर्वेनगरमधील मिलेनियम नॅशनल स्कूलमध्ये होणार असून औपचारिक उद्घाटन मंगळवारी (दि. 27) डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये होणार आहे.
ही मोहीम कशासाठी
मातीपासून स्वत:च्या हाताने मूर्ती घडवायची आणि तिची स्थापना करून त्याची मनोभावे पूजा करायची हीच आपली खरी परंपरा आहे. अशा मूर्तीमुळे पर्यावरण तर सुरक्षित राहतेच, शिवाय आपल्या मूळ परंपरेचे योग्य अर्थाने वहन होते. त्यामुळेच नागरिकांनी आगामी गणेशोत्सवात मातीच्या मूर्ती स्वत: घडवून, पर्यावरण संवर्धनास हातभार लावला पाहिजे, ही भूमिका या मोहिमेमागे आहे.
घरी बनवा शाडूची मूर्ती; स्कॅन करा क्युआर कोड
“प्रभात ग्रीन गणेशा’ या मोहिमेअंतर्गत तुम्हीही घरबसल्या शाडूची मूर्ती तयार करू शकाल. त्यासाठी या मोहिमेचे मार्गदर्शक शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा व्हिडीओ अवश्य पाहा.
श्रीगणेश बनवा शाडूचा .. संदेश पर्यावरण रक्षणाचा .. (भाग-१)