विश्वास सरदेशमुख
आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानक काही वेळेसाठी नियंत्रणाबाहेर गेले होते. यासंदर्भात आपल्याकडून चूक झाल्याचे रशियाने मान्य केले असले, तरी अमेरिका आणि रशियातील चढाओढीतून ही घटना घडल्याचे बोलले गेले. हे स्थानक उभारण्यात पुढाकार असणाऱ्या सर्व देशांमधील परस्परविश्वास अत्यंत महत्त्वाचा असून, त्यातूनच या केंद्राला भविष्यात मोठे यश प्राप्त होऊ शकते.
आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानक काही वेळेसाठी नियंत्रणाबाहेर जाणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. हा अनेक विकसित राष्ट्रांचा संयुक्त उपक्रम आहे आणि संपूर्ण जगाचे डोळे त्याकडे लागलेले आहेत. अंतरिक्षासंबंधीच्या संशोधनासाठी विकसित होत असलेल्या या आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्र प्रत्येक देश आपापल्या सोयीनुसार नियंत्रित आणि संचालित करू पाहत आहे. त्याचा परिणाम म्हणून हे केंद्र सुमारे 45 मिनिटांपर्यंत नियंत्रणाबाहेर गेले होते.
विशेष बाब अशी की, “नौका’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रशियन मोड्यूलने हे केंद्र नियंत्रणाबाहेर का जाऊ दिले होते, याची स्पष्ट माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. अर्थात, रशियन अधिकाऱ्यांनी यासाठी थोड्या वेळासाठी सॉफ्टवेअरच्या अपयशाला जबाबदार धरले आहे.
“नासा’ या अमेरिकी अंतरिक्ष संशोधन संस्थेच्या अंतरिक्ष स्थान कार्यक्रम व्यवस्थापकाच्या म्हणण्यानुसार, “नौका’ या रशियन संशोधन मोड्यूलच्या जेट थ्रस्टर्सचे अनियोजित फायरिंग झाल्याने आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकाने (आयएसएस) आपली दिशा बदलली. प्राथमिक तपासात असे स्पष्ट झाले आहे की, रशियन अंतरिक्ष एजन्सीकडूनच चूक झाली आहे.
“एनर्जिया’ या रशियन अंतरिक्ष एजन्सीचे डिझाइनर जनरल व्लादिमीर सोलोविओव यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, बहुउद्देशीय प्रयोगशाळा मोड्यूलचे थ्रस्टर्स सक्रिय करण्यासाठी एक थेट आदेश चुकून जारी करण्यात आला. त्यांनी म्हटले आहे की, सॉफ्टवेअरमधील खराबीमुळे अंतरिक्ष केंद्राच्या दिशेत थोडा बदल झाला आहे.
रशियन एजन्सीने चूक मान्य करणे ही चांगली गोष्ट आहे; परंतु अंतरिक्ष स्थानकात अगदी मामुली वाटणारा बदल झाला तरी तो गांभीर्यानेच घेतला पाहिजे. अशी केंद्रे अत्यंत चिकाटीने, अनेक वर्षांच्या प्रयत्नांतून तयार होतात. त्यावर केल्या जाणाऱ्या कोणत्याही प्रयोगात थोडीही चूक होता कामा नये.
तसे पाहायला गेल्यास चूक सुधारण्यासाठी रशियाची अंतरिक्ष संशोधन संस्थाही पुढे सरसावली होती; परंतु अधिक योगदान नासानेच दिले असे मानले जात आहे. अंतरिक्ष केंद्राला जमिनीवरील शास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा योग्य कक्षेत सोडले आहे. परंतु तरीही आता अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
अमेरिकी आणि रशियन अंतरिक्ष संशोधन संस्थांमधील स्पर्धा तीव्र झाली आहे का? दोन्ही संस्था आपापल्या पद्धतीने या अंतरिक्ष स्थानकावर नियंत्रण मिळवू पाहात आहेत का? ह्यूस्टन, टेक्सास येथील जॉन्सन स्पेस सेंटरमधील नासाच्या तज्ज्ञांचा हवाला देऊन “आरआयए’ या रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने अंतरिक्ष स्थानकावर नियंत्रण मिळविण्याच्या संघर्षाला दोन मोड्यूलच्या दरम्यान सुरू असलेली रस्सीखेच म्हणून या घटनेचे वर्णन केले आहे.
शास्त्रज्ञ आणि विकसित देशांच्या सरकारांनी सजग झाले पाहिजे. जे अंतरिक्ष स्थानक सर्व देशांच्या एकत्रित प्रयत्नांतून तयार झाले आहे, ते एकमेकांच्या समन्वयातून चालविण्यातच जगाचे भले आहे. ज्यावेळी अंतरिक्ष स्थानकात समस्या निर्माण झाली, तेव्हा त्यात सात अंतरिक्ष शास्त्रज्ञ, चालक उपस्थित होते, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही, ही चांगली गोष्ट आहे.
महत्त्वाची बाब अशी की, आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानक हे बाह्य अंतरिक्षात असलेले एक संशोधन केंद्र आहे. हे केंद्र पृथ्वीच्या निकटवर्ती कक्षेत प्रस्थापित करण्यात आले आहे. ही योजना 1998 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि 2011 मध्ये ती पूर्ण झाली.
हे स्थानक म्हणजे सर्वांत मोठा मानवनिर्मित उपग्रह आहे. हे तयार करण्यात सक्रिय भूमिका बजावणारे अमेरिका, रशिया, जपान, कॅनडा आणि युरोपीय देश यांनी सतर्क राहून पुढील वाटचाल केली पाहिजे. या सर्व देशांमधील परस्परविश्वास अत्यंत महत्त्वाचा असून, त्यातूनच या केंद्राला भविष्यात मोठे यश प्राप्त होऊ शकते.