भारत-पाक सलोखा-संबंधाचे नवे पर्व सुरू
नेहरू-अली पत्रकास काश्मीर पंतप्रधानांचा संपूर्ण पाठिंबा
काश्मीर-फाळणी सूचनेस मूठमाती
नवी दिल्ली, ता. 21 : भारत-पाक पंतप्रधानांच्या काश्मीरबाबतच्या संयुक्त पत्रकास आमचा “बिनशर्त पाठिंबा’ आहे असें काश्मीरचे पंतप्रधान बक्षी गुलाम महंमद ह्यांनीं येथें सांगितलें. आमच्या सल्लामसलतीनंतरच ह्या संयुक्त पत्रकावर भारत पंतप्रधानांचे शिक्कामोर्तब झाले असेही ते म्हणाले.
नवीन पर्व सुरू ..
ते म्हणालें, “”ह्या संयुक्त पत्रकानें गेल्या सहा वर्षांत प्रथमच भारत-पाक सहकार्य आणि सलोखा संबंधाचे पर्वास सुरुवात झाली आहे. प्रत्यक्ष वाटाघाटीने आणि शांततेच्या मार्गानें वादग्रस्त प्रश्न सोडविण्याची दोन्ही राष्ट्रांची मनोमन इच्छा ह्या पत्रकात व्यक्त होत आहे. हेवेदावे आणि वैमनस्य ह्यामुळें दोन्हीं राष्ट्रांचे फार नुकसान झाले आहे ही गोष्ट आतां दोन्ही राष्ट्रास पटली आहे. तसेच काश्मीरच्या फाळणीच्या सूचनेसहीं ह्या पत्रकान्वयें मूठमाती दिली गेली हे ह्या पत्रकाचे वैशिष्ट्य होय असें बक्षीजींनी म्हटले आहें.
नव्या सुलतानची स्थापना
मोरोक्को प्रश्न चर्चेस घेण्यास नकार
यूनो (न्यूयॉर्क), ता. 21 : मोरोक्कोचा प्रश्न यूनोच्या राजकीय समितीने विचारांत घ्यावा, अशी मागणी सिरियाच्या प्रतिनिधीकडून राजकीय समितीच्या कालच्या बैठकीत करण्यांत आली असता समितीच्या कार्यक्रमपत्रिकेवर तो विषय नसल्यानें ती मागणी मान्य करता येत नाही, असा निर्णय समितीच्या अध्यक्षांनीं दिला.
ही मागणी आशियाई-आफ्रिकन गटातर्फे करण्यांत आली होती. मोरोक्कोतील नव्या घडामोडींमुळे जी चिंता वाटत आहे ती प्रगट करावी हा ह्या मागणी मागील हेतू होय असें सांगण्यांत आलें.
नवा सुलतान…
महंमद बेन मौले, आराफा यास आज उलेमांनीं सुलतानकी बहाल केलीं; त्याच्या नेमणुकींस मोरोक्कोतील सरदारांच्या सभेंने काल रात्री मंजुरी दिली होती अशी राबात (मोरोक्को) येथील बातमी आहें. हद्दपार करण्यात आलेला मोरोक्कोचा माजी सुलतान महंमद बेन युसफ काल रात्री विमानाने कॉर्सिकांत उतरला अशी तेथील बातमी आहें. माजी सुलतान आणि त्याचा मुलगा अतिराष्ट्रवादी गटांच्या आहारी गेले होतें. ते फ्रेंचांचा अगर मोरोक्कोतील जनतेचाही अधिकार मानण्यास तयार नव्हते असे फ्रेंच रेसिडेंट जनरलने पत्रकारांस सांगितलें.