पंतप्रधान मोदींचे धोनीला खास पत्र: धोनीनेही मानले आभार
नवी दिल्ली -“”गुणवत्ता असेल तर नाव, गाव महत्त्वाचे ठरत नाही. रांचीसारख्या छोट्या गावातून पुढे येत तू यश मिळवलेस, अनेक तरुणांसाठी तू प्रेरणा बनलास. क्रिकेट कारकीर्द तर गाजवलीसच, पण आता तुझ्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा”, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला खास पत्र देत शुभेच्छा दिल्या आहेत. धोनीनेही पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
“”तू आधुनिक भारताचा चेहरा आहेस. जिथे कुटुंब आणि आडनाव यापेक्षा तरुण स्वत:ची ओळख निर्माण करतात आशाच व्यक्तींचे तू प्रतिनिधित्व करतोस. कलाकार, सैनिक आणि खेळाडू यांना केवळ पाठीवर कौतुकाची थाप ठेवावी अशीच अपेक्षा असते. त्यांनी केलेल्या कामाची दखल घेतली जावी व त्यांचे कौतुक व्हावे असेच त्यांना वाटत असते. तू तुझ्या कामगिरीतून सातत्याने हेच सिद्ध केलेस”, असेही मोदी यांनी पत्रात नमूद केले आहे.
“”स्वातंत्र्यदिनी तू अनपेक्षितपणे एक व्हिडीओ पोस्ट करत निवृत्तीचा निर्णय जाहीर केलास. काहीही न सांगता निर्णय घेण्याची तुझी सवय कौतुकास्पद आहे. तुझ्या या निर्णयाने संपूर्ण देश निराश झाला. तू दिलेल्या योगदानासाठी आम्ही सर्व तुझे आभारी आहोत. एक फिनिशर म्हणून असलेली तुझी ओळख कायमच लक्षात राहील. भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार अशीही ओळख तू निर्माण केलीस.
जागतिक क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा तुझ्या नेतृत्वाखाली निर्माण झाला. क्रिकेटच्या इतिहासात तुझ्या नावाचा समावेश निश्चितच एक सर्वोत्तम कर्णधार, फलंदाज तसेच अफलातून यष्टिरक्षक म्हणून केला जाईल यात शंका नाही. कठीण प्रसंगातही शांत राहणे व सामना जिंकण्यासाठी स्वतःसह सर्व खेळाडूंनाही सकारात्मक ठेवणे यात तू सातत्याने यशस्वी झालास. फिनिशर खेळी करत 2011 साली झालेली विश्वकरंडक स्पर्धा तू संघाला जिंकून दिलीस हे कोणीही विसरू शकत नाही. देशातील लाखो तरुणांसाठी तू प्रेरणास्थान ठरलास”, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी धोनीची प्रशंसा केली आहे.