संसदीय राज्यपद्धतीत बदल करण्याची आवश्यकता नाही
नवी दिल्ली, दि. 3 – घटनेत दुरुस्त्या सुचविण्यासाठी अ. भा. कॉंग्रेसचे अध्यक्ष बारुआ यांनी नेमलेल्या समितीचे सर्वसाधारणपणे असे मत आहे, की देशातील संसदीय राज्यपद्धतीत बदल करण्याची जरुरी नाही. येथे अध्यक्षीय राज्यपद्धती सुरू करण्याची काहीही आवश्यकता नाही. कॉंग्रेसचे सरचिटणीस अंतुले यांनी ही माहिती दिली. समितीची बैठक माजी परराष्ट्र मंत्री स्वर्णसिंग यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती.
सुप्रीम कोर्टाची सुट्टी
नवी दिल्ली – वार्षिक उन्हाळी सुटीसाठी सुप्रीम कोर्टाचे कामकाज 10 मे ते 18 जून या काळासाठी बंद राहील. मात्र त्वरित स्वरुपाच्या कामासाठी न्या. भगवती व न्या. गुप्ता या काळात काम पाहतील.
पौंडाच्या संदर्भात रुपयाची किंमत वाढली
मुंबई – रुपयाच्या पौंड स्टर्लिंगशी असलेल्या विनिमय दरात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने 2.0 टक्के वाढ जाहीर केली आहे. ही वाढ लगेच अंमलात येईल. पौंड स्टर्लिंगची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत पुन्हा कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला.
जायकवाडी स्फोट प्रकरणी चौकशी गुप्तचर खात्याकडे
मुंबई – जायकवाडी प्रकल्पावरील भू-मापन कार्यालयात 31 मार्च रोजी झालेल्या स्फोटाची चौकशी करण्याचा आदेश गुप्तचर पोलिसांना देण्यात आला आहे, अशी माहिती गृहखात्याचे राज्यमंत्री रमेश वळवी यांनी आज विधानसभेत दिली. स्फोट झाला तेव्हा कचेरीत सहा व्यक्ती काम करीत होत्या. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास चालू आहे.