लोणी काळभोर -शेळीने घरासमोरील गवत खाल्ल्याच्या कारणावरून दिराने चुलीवर ठेवलेले उकळते डाळीचे पातेले वहिनीच्या डोक्यावर व पाठीवर टाकून गंभीर दुखापत केली. ही घटना (दि.10) रात्री ऊरूळी कांचन येथील पांढरस्थळ येथे घडली आहे. याप्रकरणी राहुल खलसे (रा. उरूळी कांचन) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी संपत खलसे त्यांची पत्नी सोनाली, सोनालीची आई लिलाबाई कसबे व बहिण लता खलसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांची चुलती साधनाबाई यांनी घरासमोर चुलीवर डाळीचे कालवण शिजवण्यासाठी टाकले होते. साधनाबाई यांनी पाळलेली शेळीचे दोरी सुटल्याने ती चारा शोधत संपत खलसे यांच्या घरासमोर गेली. त्यांच्या दारात गवत खाऊ लागली. त्यामुळे संपत खलसे साधनाबाईंकडे आला.शिवीगाळ करून अंगावर धावून गेला.
त्यावेळी संपत याची पत्नी सोनाली, सोनालीची आई लिलाबाई व बहिण लता खलसे त्याठिकाणी आले. ते सर्वजण शिवीगाळ करू लागले. त्यावेळी संपत खलसे याने चुलीवर ठेवलेले उकळते डाळीचे पातेले उचलून चुलती साधनाबाई हिचे डोक्यावर व पाठीवर टाकले. साधनाबाई यांना उपचारासाठी ससून हॉस्पिटल पुणे येथे दाखल केले.