नगर – करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने शाळा-महाविद्यालये बंदच आहेत. अशावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्राचा “वर्क फ्रॉम होम’ अभ्यास करण्याचा अनोखा उपक्रम रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयाने सुरु केला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. भाऊसाहेब औटी यांनी दिली.
महात्मा जोतिबा फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक योगदान आभाळाएवढे आहे. परंतु, नव्या पिढीतील अनेकांना त्याची माहिती नाही. त्यामुळे फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक विद्यार्थीनींने त्यांच्या चरित्राचा अल्पसा का होईना, अभ्यास घरीच करून “वर्क फ्रॉम होम’ या अनोख्या पद्धतीने चरित्र अभ्यास करावा, अशी संकल्पना राबविण्यात येणार आहे. तेच विद्यार्थ्यांतर्फे महात्मा फुलेंना अभिवादन असेल, असे प्राचार्य डॉ. औटी यांनी सांगितले.
रयत शिक्षण संस्था शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा यशस्वीपणे सांभाळत असून लॉकडाउनच्या काळात येणाऱ्या थोरामोठ्यांच्या जयंत्या -पुण्यतिथी त्यांचे चरित्र अभ्यासून साजरी करण्याची संकल्पना महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी मांडली होती, अशी माहिती प्रा. सतीश शिर्के यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीदिनी सुद्धा असेच अभिवादन केले जाणार आहे. सध्या महाविद्यालयाचे कामकाज बंद असून सोशल मीडियाचा आधार घेऊन मुलींना महात्मा फुले यांचे चरित्र थोडक्यात उपलब्ध करून दिले आहे. त्याचा अभ्यास करण्याबाबत संदेश दिला असल्याचे उपप्राचार्य डॉ मनोहर करांडे यांनी सांगितले.
संस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. योगिता रांधवणे, प्रा. बबनराव कातोरे, डॉ. संतोष गायकवाड, डॉ. हेमंत अकोलकर, प्रा. अनिल कापरे, प्रा. संभाजी कातोरे, प्रा. अनुप शिंदे त्यासाठी परिश्रम घेत आहेत. या उपक्रमात सर्वांनीच सहभागी व्हावे, असे आवाहन रयतचे सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, महाविद्यालय विकास समिति सदस्य स्नेहल काळे यांनी केले आहे.