मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही अनेकदा तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळत होते. नुकतंच शिल्पा शेट्टीने तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे तिने तिच्या आगामी चित्रपटाचे एक पोस्टरही सोशल मीडियावर शेअर केले आहे.
‘सुखी’ असे शिल्पा शेट्टीच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. नुकतंच शिल्पा शेट्टीने तिच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या पोस्टरवर शिल्पा शेट्टीचा अनोखा लुक पाहायला मिळत आहे. यात शिल्पा शेट्टीच्या एका हातात लाटणे, इस्त्री अशा वस्तू दिसत आहे. तर तिच्या दुसऱ्या हातात पाकिट, डब्बा, घड्याळ अशा वस्तू पाहायला मिळत आहे. तसेच तिच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळेच विचार सुरु आहेत.
View this post on Instagram
शिल्पा शेट्टी हे पोस्टर शेअर करताना म्हणाली, “मी थोडी मूर्ख आहे. माझे जीवन म्हणजे एक खुले पुस्तक आहे. जगाने मला निर्लज्ज म्हटलं तरी काय? माझी स्वप्ने इतर कोणापेक्षा कमी नाहीत.” विशेष म्हणजे शिल्पा शेट्टीच्या आगामी सुखी चित्रपटाची टॅगलाईनही फार भन्नाट आहे. ‘बेधडक, बेशरम आणि बेपरवाह’, अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे.
‘सुखी’ चित्रपटाचे दिग्दर्शन सोनल जोशी करत आहे. तर त्याची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा आणि शिखा शर्मा करत आहेत. या चित्रपटात शिल्पा ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.