पुणे -बारावीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी), हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान आणि सर्फेस कोटिंग तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रवेशासाठीचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयने जाहीर केले आहे. बारावीनंतरच्या या अभ्यासक्रमांना अर्ज करण्याची प्रक्रिया 12 जूनपासून सुरू होणार असून, अर्जासाठी अंतिम मुदत 3 जुलैपर्यंत राहणार आहे.
तंत्रशिक्षण विभागाने पदविका प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दोन पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय म्हणजे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून “ई-स्क्रुटनी’ पद्धतीचा पर्याय निवडू शकतील. यात विद्यार्थी कोणत्याही ठिकाणावरून संगणक अथवा स्मार्टफोनद्वारे ऑनलाइन अर्ज भरतील आणि सबमीट करतील. आवश्यक कागदपत्रे अपलोड करतील. अर्जाच्या पडताळणीसाठी कोठेही प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही.
दुसरा पर्याय म्हणजे विद्यार्थी मोबाईल अथवा संगणकावरून ऑनलाइन नोंदणी करून “प्रत्यक्ष स्क्रुटनी’ हा पर्याय निवडू शकतील. यात विद्यार्थी जवळच्या सुविधा केंद्रावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करतील. ऑनलाइन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे इत्यादी प्रक्रिया सुविधा केंद्रावर स्वत: नि:शुल्कपणे करू शकतील, असे तंत्रशिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे देण्यात आली.
थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रवेशासाठीचे वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात विद्यार्थी हा बारावी उत्तीर्ण अथवा आयटीआयचा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असला पाहिजे. यासाठी अर्ज करण्याची मुदत 12 जून ते 3 जुलैपर्यंत आहे.
प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक
अर्ज करण्याची मुदत : 12 जून-3 जुलै
प्राथमिक गुणवत्ता यादी : 5 जुलै
यादीवर आक्षेप नोंदवणे : 5 ते 9 जुलै
अंतिम गुणवत्ता यादी : 11 जुलै
पॉलिटेक्निक प्रवेशास सुरुवात
दहावीनंतरची पदविका अभ्यासक्रम अर्थात पॉलिटेक्निकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 21 जूनपर्यंत आहे. प्रवेशासाठी प्राथमिक गुणवत्ता यादी 23 जून रोजी, तर अंतिम गुणवत्ता यादी 29 जून रोजी प्रसिद्ध होणार आहे.