संगमनेर – संगमनेरच्या वैभवात भर पडावी अशी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची प्रशस्त इमारत घुलेवाडी येथे उभी राहिली. गाड्या लावण्यासाठी पत्र्याचे शेड उभारण्यात आले. परंतु दोन दिवसांपूर्वी झालेल्या वाऱ्यामुळे ते शेडच उडून गेले. विशेष म्हणजे त्या शेडशेजारी एक सुकलेले झाड उभे आहे. त्या झाडाला काहीच झाले नाही. त्यामुळे त्या ठेकेदाराने काम निष्कृष्ट दर्जाचे केले असल्याचे वकिलांनी सांगितले.
शहरात नेहरू उद्यानासमोरच्या बाजूला जुने न्यायालय होते. ही इमारत अनेक वर्षांची होती तसेच त्या ठिकाणी वाहनांची सतत कोंडी होत असे. दोन वर्षांपूर्वी घुलेवाडीच्या न्यायालयाचे काम पूर्ण झाले आणि प्रत्यक्ष न्यायदानाला सुरुवात झाली. या ठिकाणी अनेक भिंतींना तडे गेले. एका ठिकाणी इमारतीच्या वरच्या भागातील कोपरा पडला आणि आता कॅन्टीनसमोर असणारी शेडच वाऱ्याने उडून गेल्याने त्या ठेकेदारावरच प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शहरासह घुलेवाडी परिसरात दोन दिवसांपूर्वी तुरळक वारा सुटला होता.
न्यायालय परिसरात गाड्या लावण्यासाठी उभारण्यात आलेली पत्र्याची शेड काही क्षणात उडून गेली. मात्र, शेजारी असलेले सुकलेले झाड मात्र दिमाखात उभेच होते. काही लोक कमकुवत आणि जीर्ण झालेले ते झाड पडण्याची वाट पाहत होते. मात्र, भरभक्कम असलेली पत्र्याची शेड डोळ्यादेखत उडून गेली आणि झाड मात्र तेथेच उभे त्यामुळे ज्या ठेकेदाराने याचे काम केले त्या ठेकेदाराची चौकशी होऊन त्यावर कारवाईची मागणी वकिलांनी केली आहे.
न्यायालय इमारतीच्या भिंतींना अनेक ठिकाणी तडे गेले. काही ठिकाणी पावसाचे पाणी आत येते. गाड्या पार्किंगची सोय नाही, पाण्याची मुबलक सोय नाही, अशा अनेक गोष्टींची उणीव या ठिकाणी आहे. ठेकेदाराने केलेले काम हे निष्कृष्ट दर्जाचे असल्याने कामाची पाहणी करून त्या ठेकेदारावर कारवाई व्हावी हीच आमची मागणी असल्याचे संगमनेरचे वकील म्हणाले.