Pakistan – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तेहरिक ए इन्साफ या पक्षावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. पक्षाचे संस्थापक इम्रान खान आणि त्यांच्या पक्षातील अन्य वरिष्ठ नेत्यांविरोधात ९ मे रोजीच्या दंगल आणि सायफर प्रकरणी गोपनीय कायद्याचा भंग केल्याप्रकरणी दाखल असलेल्या खटल्यांमध्ये ते जर दोषी आढळले, तर पीटीआय पक्षावर बंदी घातली जाऊ शकते, असे पाकिस्तानातील माध्यमांनी म्हटले आहे.
पीटीआय पक्षाने २००३ पासून अवैध मार्गाने निधी संकलन केले असल्याचा निष्कर्ष निवडणूक आयोगाने अनेक वर्षांपासून केलेल्या तपासानंतर एकमताने काढला आहे.तसेच इम्रान खान यांनी अमेरिकेतील पाक दूतावासाकडून मिळालेले अमेरिकेच्या राजदूताचे पत्र भर सभेमध्ये दाखवून अधिकृत गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याचे सायफर प्रकरण देखील इम्रान यांच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे.
तसेच गेल्या वर्षी ९ मे रोजी झालेल्या दंगलीदरम्यान पाकिस्तानच्या लष्करी मुख्यालयावर पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे इम्रान खान आणि पीटीआयच्या अन्य वरिष्ठ नेत्यांवर खटले दाखल झाले आहेत.
या प्रकरणीही इम्रान आणि अन्य नेते दोषी ठरण्याची शक्यता आहे. यामुळे पाकिस्तानातील सत्तारुढ पीएमएल-एन पक्षाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंट आघाडीच्या सरकारला पीटीआय पक्षावर बंदी घालण्याची आयती संधीच मिळाली आहे.