पुणे-मार्केट यार्डात रविवारी एका शेतकऱ्याच्या डाळिंबाला किलोला घाऊक बाजारात तब्बल 251 रुपये असा उच्चांकी भाव मिळाला. हौशिराम आबा आटोळे असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांचा माल फळ बाजारातील यशवंत ऊर्फ तात्या कोंडे, यशराजे कोंडे यांच्या गाळ्यावर ही आवक झाली होती. दोन दिवसांपूर्वी आटोळे यांच्या डाळिंबाला किलोस 191 रुपये भाव मिळाला होता. त्यानंतर रविवारी भावात वाढ झाली. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभागप्रमुख दत्तात्रय कळमकर यांच्या हस्ते आटोळे यांच्या सत्कार करण्यात आला. त्यावेळी गटप्रमुख बाळासाहेब कोंडे उपस्थित होते.
डाळींबाचा दुसरा बहर सुरू आहे. मार्केट यार्डात डाळींबाची अपेक्षित आवक होत नाही. दर्जेदार फळाला मागणी आहे. रविवारी येथील बाजारात 100 ते 150 टन डाळिंबाची आवक झाली. घाऊक बाजारात भगवा, गणेश आणि आरक्ता डाळिंबास किलोस अनुक्रमे 35 ते 120, 10 ते 40, आरक्ता 10 ते 60 रुपये भाव मिळत आहे. लिलावामध्ये राजू सूर्यवंशी यांनी 251 रुपये किलोप्रमाणे खरेदी केले. 700 ते 800 ग्रॅम वजनाचे हे एक फळ आहे.