मातीमिश्रित परमिटच्या नावाखाली अवैध उपसा जोरात सुरू
संगमनेर : संगमनेर तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या 600 ब्रास मातीमिश्रित वाळू परमिटच्या नावाखाली वाळूतस्करांनी मुळा नदी पात्रातून जेसीबी, पोकलेनच्या साह्याने रात्रंदिवस बेसुमार वाळूउपसा केल्याचे एका व्हिडिओद्वारे समोर आले आहे. त्यामुळे साकुर परिसरातील मातीमिश्रित परमिट प्रकरणी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी चौकशीकरून नदीपात्रात पडलेल्या खड्ड्यांचे पंचनामे करण्याचे आदेश सबंधित प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
साकूर येथील मांगमळई परिसरातील मुळा नदीच्या कडेला असलेल्या एका शेतकऱ्याच्या खासगी क्षेत्रात 600 ब्रास मातीमिश्रित वाळूची परवानगी संगमनेर महसूल प्रशासनाने 4 ते 28 फेब्रुवारी अशा 24 दिवसासाठी दिली. मागील वीस दिवसांपासून या ठिकाणी वाळू वाहतूक केली जात आहे. परंतु या वाळूतस्करांनी संगमनेर-पारनेर तालुका हद्दीतील असणाऱ्या मुळा नदीपात्राकडे आपला मोर्चा वळवित नदीपात्रातून जेसीबी, पोकलेनच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूउपसा केला आहे.
मातीमिश्रित परमिटच्या नावाखाली मुळानदीपात्रात दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असल्याचे शनिवारी (दि.22) सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओद्वारे समोर आले. त्यानंतर नदी पत्रातुन वाळू उपसा थांबवण्यात आला असला, तरी यासंबंधीचे पुरावे असतानाही महसूल व पोलीस प्रशासनाने कोणत्या प्रकारची कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी याप्रकरणी चौकशीकरून नदीपात्रात पडलेल्या खड्ड्याचे पंचनामे करण्याचे आदेश सबंधित प्रशासनाला द्यावे अशी मागणी स्थानिकांन केली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्वाधिक कारवायासंगमनेर, अकोले तालुक्यांत अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सर्वाधिक कारवाई संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांनी केली आहे. याकडे महसूल प्रशासनाने सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. मात्र त्यांना त्यांच्याच खात्यातील अधिकाऱ्यांची मदत होताना दिसत नाही.
कारवाईत प्रांताधिकाऱ्यांचा आखडता हात?
संगमनेर, अकोले तालुक्यांत मुळा व प्रवरा नदीपात्रांतून मोठ्याप्रमाणात सर्रास वाळू उपसा सुरू आहे. संबंधित तालुक्यांतून जास्तीत जास्त अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून शासनाच्या महसूलामध्ये वाढ होऊन महसूलचे उद्दिष्ट पूर्ण होईल. मात्र याकडे प्रांताधिकाऱ्यांचे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कारभाराबद्दल प्रशचिन्ह उपस्थित केले जात आहे.