पावणे चार कोटींचा खर्च; उपमहापौर तुषार हिंगे यांची माहिती
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नेहरूनगर, पिंपरी येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास हॉकी स्टेडिमय मैदानावरील पॉलिग्रास खराब झाल्यामुळे हॉकी शौकीनांमध्ये नाराजी पसरली होती. अखेर या ठिकाणचे पॉलिग्रास बदलण्यात येणार असून त्यासाठी महापालिका एकूण 3 कोटी 76 लाख 63 हजार खर्च करणार आहे, अशी माहिती क्रीडा समितीचे सभापती तथा उपमहापौर तुषार हिंगे यांनी दिली.
स्टेडिमयच्या मैदानावरील पॉलिग्रास 4 ते 5 वर्षांपासून अनेक ठिकाणी फाटले होते. पॉलिग्रासचे आयुष्यमान संपल्याने ते अनेक ठिकाणी खराब झाले होते. फाटलेल्या पॉलिग्रासमध्ये पाय किंवा स्टिक अडकून तसेच, गुळगुळीत पृष्ठभागामुळे घसरून पडल्याने खेळाडू जखमी होण्याचे प्रमाण वाढल्याने हॉकी खेळाडू तसेच हॉकी शौकिनांमधून याबाबत नाराजी व्यक्त होत होती. तसेच नव्याने पालिग्रास बसविण्यात यावे, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती.
या मागणीची दखल घेऊन क्रीडा समितीने नवे पॉलिग्रास घालण्याचा निर्णय घेतला, असे हिंगे यांनी सांगितले. पॉलिग्रास बसविण्यासाठी स्थापत्य विभागाने 4 कोटी 15 लाख खर्चाची निविदा सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध केली होती. स्पोर्टीना एक्झिमची 9 टक्के कमी 3 कोटी 78 लाख दराची निविदा प्राप्त ठरली. त्या खर्चास स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिल्याने पॉलिग्रास बदलण्याचा मार्ग मोकळ झाला. स्टेडियममधील जुने पॉलिग्रास काढून नवे निळ्या रंगाचे पॉलिग्रास बसविणाचे काम पुढील तीन महिन्यांत पूर्ण केले जाईल. त्यामुळे शहरातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी मैदाना उपलब्ध होणार आहे, असेही हिंगे म्हणाले.
स्थापत्य विभागाकडून समन्वयाचा अभाव
क्रीडाविषयक काम करताना क्रीडा विभाग, त्या-त्या खेळाचे तज्ज्ञ, अनुभवी व ऑलिपिंक खेळाडू यांच्याशी पालिकेचा स्थापत्य विभाग समन्वय साधत नसल्याने काम योग्य प्रकार होत नाही. परिणामी, खेळाच्या सरावासाठी तयार केलेले मैदाने, हॉल वापराअभावी पडून राहतात. त्यामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होते, अशी तक्रार क्रीडा विभागाचे सभापती तथा उपमहापौर तुषार हिंगे यांनी यावेळी बोलून दाखविली.