पुणे : कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शांततेत मतदान सुरु आहे. एकवाजेपर्यंत कसब्यामध्ये 18.5 टक्के मतदान झाले. भर उन्हातही मतदान केंद्रांवर गर्दी पहायला मिळत आहे.
मतदान सुरु होण्यापूर्वी सकाळी सहा वाजता मतदान यंत्राची चाचणी 270 मतदान केंद्रांवर घेण्यात आला. यामध्ये तीन मतदान यंत्रांमध्ये समस्या निर्माण झाल्याने तात्काळ ही यंत्रे बदलण्यात आली. सर्व मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजता मतदान सुरुळीतपणे सुरु झाले.
मतदानासाठी काही मतदान केंद्रांवर रांगोळी काढण्यात आली. तर काही मतदान केंद्रावर फुग्यांची सजावट करण्यात आली आहे. तसेच काही मतदान केंद्रांवर सनईचे वादन सुरु होते. अशा मंगलमय वातावरणात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
दरम्यान सकाळी सात ते नऊ या वेळेत 6.5 टक्के मतदान झाले होते. तर सकाळी 9 ते 11 या वेळेत 8.25 टक्के मतदान झाले. तर 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 18.5 टक्के मतदान झाले. दरम्यान मतदानाची अंतिम वेळ ही सहा वाजेपर्यंत आहे. त्यामुळे उन्हाचा चटका कमी होताच चारनंतर मतदानाची टक्केवारीत अधिक भर पडेल. कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे.