“राजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत होतेय”; काँग्रेसकडून संजय राऊतांना टोला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युपीएचे अध्यक्षपद देण्याच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस चांगलीच नाराजी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासहित इतर नेत्यांनीही ही नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. दरम्यान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी एका वृत्तवाहिनीशी संजय राऊतांची राजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत होत असल्याचा टोला लगावला आहे.

“युपीएचे नेतृत्व सोनिया गांधीच करणार आहेत. शेवटी काँग्रेस हा देशव्यापी पक्ष आहे. कदाचित अडचणीच्या काळातून जात असेल, मात्र देशाचे नेतृत्व काँग्रेसकडे आहे आणि त्यांच्याकडेच राहणार आहे. अवघड दिवस निघून जातील आणि पुन्हा काँग्रेसेच दिवस येतील. त्यामुळे अशी कल्पना मांडणं मला योग्य वाटत नाही,” असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. “संजय राऊत हे एका बाजूला राजकारणी आहेत. आघाडी सरकार होण्यात त्यांचा मोठा सहभाग असल्याचं आम्ही जाहीरपणे सांगत असतो. पण ते संपादकही आहेत. कदाचित राजकारणी आणि संपादक यामध्ये त्यांची गल्लत होते का काय असं वाटून जातं. तीन पक्ष एकत्र असताना आणि चांगलं काम करत असताना त्यांना बळ देणं त्यांचं काम आहे. असं वक्तव्य करुन मनात दोष निर्माण होतो हे त्यांनी करु नये,” असं स्पष्ट मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे.

“अशा वक्तव्यामुळे नाराजी होत असते. जेव्हा आघाडीचे प्रमुख एकत्र येतो तेव्हा यावर साहजिकच चर्चा होते. आघाडीचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे, आम्ही घटकपक्ष आहोत. सर्वांची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. सोनिया गांधी आणि शरद पवारांमध्ये चांगले संबंध असून असं वक्तव्य करुन भेद निर्माण करण्याची काही गरज नाही,” असंही ते म्हणाले आहेत.

शरद पवार आणि अमित शाह यांच्या अहमदाबादमधील भेटीच्या वृत्तावरही त्यांनी भाष्य केलं. “अशा बातम्यांना आम्ही फार महत्व देत नाही. राष्ट्रवादीने देखील यासंबंधी स्पष्ट खुलासा केला आहे. रात्रीच मी पवारांच्या तब्येतीची विचारणा करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी बोललो. त्यांनीदेखील मुद्दाहून हा विषय काढला आणि कसे लोक भेद, गैरसमज निर्माण करत असल्याचं सांगितलं. त्यांना भेटायचं असतं तर दिल्लीत सर्वांची घरं आहेत तिथेही भेटू शकतात. त्यामुळे अशा प्रकारचं वेगळं काही असेल असं मला वाटत नाही,” असं ते म्हणाले आहेत. “विरोधी पक्ष काही खडे टाकण्यात यशस्वी होतो आणि मीडियाकडून तो विषय उचलला जातो. वस्तुस्थिती वेगळी असते आणि मीडियामध्ये वेगळं सुरु असतं,” असंही यावेळी ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.