“स्वीकृत’ नगरसेवकांच्या निवडीसाठी राजकीय हालचाली गतिमान

सातारा  -करोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्थगित करण्यात आलेली स्थायी समिती, विषय समित्या व स्वीकृत सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे. नगरविकास विभागाने महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींना याबाबत आदेश दिले आहेत. सातारा पालिकेतही स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. करोनामुळे या निवडी ऑनलाइन प्रणालीद्वारे होण्याची शक्‍यता आहे. 

पालिकेत सातारा विकास आघाडीचे 22, नगरविकास आघाडीचे 12 व भाजपचे सहा नगरसेवक आहेत. संख्याबळानुसार “साविआ’च्या वाट्याला दोन, नविआ व भाजपच्या वाट्याला प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवकपद आले आहे. साविआचे ऍड. दत्ता बनकर प्रारंभापासूनच स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करीत आहेत.

गतवर्षी खा. उदयनराजे भोसले यांनी त्यांचे निष्ठावंत प्रशांत आहेरराव यांना संधी दिली होती. नविआने अविनाश कदम तर भाजपने विकास गोसावी यांना संधी दिली होती. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीला दि. 7 जुलैला एक वर्ष पूर्ण झाले होते. त्यानंतर गोसावी यांनी पक्षाचा आदेश प्रमाण मानून आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला होता; परंतु साविआ व नविआच्या नेत्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

दरम्यान, करोना संक्रमणाच्या काळात स्थायी समिती, विषय समित्या व स्वीकृत सदस्यांच्या निवडी करू नयेत, असे आदेश नगरविकास विभागाने महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींना दिले होते. याबाबतचे परिपत्रक 27 मार्च रोजी काढण्यात आले होते. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक निवडीबाबत हालचाली थंडावल्या होत्या; परंतु दि. 9 सप्टेंबर रोजी नगरविकास विभागाने निवडीबाबतचे आदेश निर्गमित केल्याने इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

सातारा पालिकेत खा. उदयनराजे यांच्या आघाडीची सत्ता आहे. स्वीकृत नगरसेवकपदी विद्यमान सदस्यांना मुदतवाढ द्यायची की, खांदेपालट करायचा याचा निर्णय खासदारांचा असेल. अविनाश कदम यांच्याबाबतही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.